![]()
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) महागाई, बेरोजगारी, शेतकरी-शेतमजुरांचे प्रश्न आणि महिलांवरील अत्याचाराविरोधात आक्रमक झाला आहे. या मुद्द्यांवर लक्ष वेधण्यासाठी भाकप १ सप्टेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर भव्य मोर्चा काढणार आहे. या मोर्चातून ‘बदलाव जरुरी है’ असा नारा दिला जाईल. देशात वाढती महागाई, शेतकरी-शेतमजुरांच्या समस्या, पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांची होणारी फसवणूक, युवकांमधील बेरोजगारी, तसेच महिला व अल्पसंख्याकांवर वाढते अत्याचार या गंभीर प्रश्नांवर केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. दिल्लीतील या आंदोलनासाठी भाकपने जिल्हाभर जनजागरण मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत अमरावती येथील राजकमल चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सामान्य नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्याची मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार कामगार, शेतकरी, विद्यार्थी, युवक आणि महिलांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात भाकप ठामपणे उभा असल्याचे पक्षाने स्पष्ट केले. राजकमल चौकात कॉर्नर सभा घेऊन आणि पत्रके वाटून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच, दिल्लीतील आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही कार्यकर्त्यांनी केले. यावेळी कॉ. अशोक सोनारकर, डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे, जे. एम. कोठारी, सुनील घटाळे, निळकंठ ढोके, जयेंद्र भोगे, उमेश बनसोड, गजानन दरेकर, अशोक राऊत, सुशील ढोले, दिगंबर नगेकर, ज्ञानेश्वर मेश्राम, नंदकिशोर नेतनराव, राहुल तेलमोरे, संगीता जांभे, जानराव मसराम, मधुकर ईळपाचे, हरिभाऊ तोराम, नागोराव कोडापे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Source link
महागाई, बेरोजगारीविरोधात भाकपचा दिल्लीत मोर्चा:‘बदलाव जरुरी है’ घोषणेसाठी जिल्हाभर जनजागरण