![]()
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) ‘बदलाव जरुरी है’ या देशव्यापी जनजागरण अभियानांतर्गत नांदगाव तालुक्यात १२ गावांमध्ये सभा घेतल्या. पक्षाचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य कॉम्रेड तुकाराम भस्मे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते १ सप्टेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या आंदोलनासाठी शेतकरी, कामगार, युवक आणि असंघटित क्षेत्रातील लोकांना एकत्र करत आहेत. या अभियानाची सुरुवात ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी मंगरूळ चव्हाळा येथे रॅली आणि जाहीर सभेने झाली. त्यानंतर नांदगाव खंडेश्वर, शिवणी रसुलापूर, वाघोडा, फुबगाव, येणस, येवती, शिंगणापूर, धामक, सातरगाव, सावनेर आणि मांजरी म्हसला या गावांमध्ये सभा घेण्यात आल्या. प्रत्येक सभेपूर्वी गावात रॅली काढून जनतेशी संवाद साधण्यात आला. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन कठीण झाले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने जनतेला मोठा फटका बसत आहे. यासोबतच, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळत नाही, युवकांमध्ये बेरोजगारी वाढत आहे आणि शिक्षण व आरोग्य क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात व्यापारीकरण होत आहे, असे भाकप कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणले. या अभियानातून शेतकऱ्यांना कायदेशीर हमीसह किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळावी, मनरेगासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून ग्रामीण रोजगार वाढवावा, सार्वजनिक आरोग्य व शिक्षण व्यवस्था मजबूत करावी आणि युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात येत आहेत. महिला, दलित आणि आदिवासींच्या सुरक्षिततेची हमी देण्याची मागणीही करण्यात आली. कामगारांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या चारही श्रमसंहिता रद्द करून पूर्वीचे कामगार कायदे पुन्हा लागू करावेत, असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा द्यावी आणि कंत्राटीकरण व असुरक्षित रोजगाराला आळा घालावा, अशी मागणीही भाकप करत आहे. देशाची संपत्ती मोजक्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या हितासाठी वापरण्याऐवजी ती शेतकरी, कामगार, गरीब आणि सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी वापरली पाहिजे, असा संदेश कार्यकर्ते देत आहेत. या जनजागरण अभियानात पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. सुनील मेटकर, तालुका सचिव कॉ. संतोष सुरजुसे, सहसचिव कॉ. विनोद तऱ्हेकर, कॉ. ओमप्रकाश सावळे यांच्या नेतृत्वात विजय मंडवधरे, हरिदास राजगिरे, प्रज्वल ढोके, नारायणराव भगवे, संजय मंडवधरे, अरुणभाई शिंदे, देवेंद्र कंठाळे, माधव ढोके, लिलेश्वर आगळे, योगेश अवझाडे आणि मनोज गावनर आदी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. जिल्ह्याच्या इतर भागांतही हे अभियान सुरू आहे.
Source link
'बदलाव जरुरी है' अभियान: नांदगाव तालुक्यात 12 गावांत सभा:1 सप्टेंबरला दिल्लीत आंदोलनासाठी कार्यकर्त्यांची हाक