Headlines

मेळघाटातील समस्यांवर विभागीय आयुक्तांना साकडे:पाणी, शिक्षण, सावकारी पाशासह 40 प्रश्नांवर तातडीने कारवाईचे निर्देश




मेळघाटमधील चिखलदरा आणि धारणी तालुक्यांतील नागरिकांच्या मूलभूत समस्यांसह एकूण ४० महत्त्वाच्या प्रश्नांवर एका शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. जलजीवन मिशनमधील घोटाळ्यांपासून ते शाळा, वीज, आरोग्य, खतांचा काळाबाजार आणि सावकारी पाशापर्यंतच्या विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. आयुक्तांनी या सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेतली असून, संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना व कारवाईचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांना शासकीय दरापेक्षा जास्त भावाने युरिया खताची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाईची मागणीही यावेळी करण्यात आली. चर्चेदरम्यान पिंपळखुटा येथील शासकीय निवासी आश्रम शाळेतील गंभीर प्रकरण समोर आले. इयत्ता १ ते १२ वीच्या एकूण ५३३ विद्यार्थ्यांपैकी १० वी व १२ वीचे तब्बल १४५ विद्यार्थी अजूनही शाळेत गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. ही माहिती मिळताच आयुक्त सिंघल यांनी थेट शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून त्यांना जाब विचारला. तसेच, संबंधित विभागप्रमुखाशी बोलणी करून दोन दिवसांच्या आत वस्तुनिष्ठ अहवाल मागवला आहे. मेळघाटातील नागरिकांना गावातच रोजगार मिळावा यासाठी सामाजिक वनीकरण विभागामार्फत ३,००० कोटी वृक्षारोपणाचे कार्य केले जावे, अशी मागणी करण्यात आली. मेळघाटातील पशुवैद्यकीय दवाखाने नेहमी बंद राहत असल्याने त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणीही शिष्टमंडळाने केली. वीज नसलेल्या गावांची व नागरिकांची यादी सादर करण्याचे निर्देशही यावेळी दिले गेले. प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी भरारी पथकांच्या गाड्या वाढवण्याबाबतही चर्चा झाली. आयुक्तांशी चर्चा झाल्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन, बीएसएनएल, महावितरण, सौर ऊर्जा आदी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही शिष्टमंडळातील सदस्यांनी भेटी घेतल्या. दरम्यान, चिखलदरा येथील एकताई ग्रामपंचायत क्षेत्रातील बीएसएनएल मोबाईल टॉवरचे काम वेगाने पूर्ण करून नेटवर्क सुरळीत करण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहे. चिखलदरा तालुक्यातील ‘सुमिता’ गावात जलजीवन मिशनअंतर्गत मोठा घोटाळा झाल्याचे चर्चेदरम्यान स्पष्ट झाले. मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार (पीएलआय ११३/२००७) सुमिता गावातील ७६ घरांमध्ये नळ बसवण्यात आले असले तरी प्रत्यक्षात पाणी पोहोचलेलेच नाही. संबंधित विभागाने प्रपत्रात पाण्याची सोय केल्याचा बनाव केला होता. यावर उपाययोजना करून तातडीने योग्य पाणीपुरवठा करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. यावेळी ॲड. बंड्याभाऊ साने, रामबाबू दहिकर, विठ्ठल हेकडे, उषाताई बेलसरे, अविनाश बेलसरे, वासुदेव बेलसरे, तोताराम भाऊ, सोनाजी भाऊ, रामदासभाऊ भिलावेकर, ॲड. दशरथभाऊ बावनकर, हरीश येवले, दीपक मसराम, रामदास हिवराळे, सोनू भुसारे, सुमित्राताई अहाके, अनिल मावस्कर, जयकिसन कास्देकर, करण दारसिंबे, लक्ष्मण बेलसरे, सरिता बेलसरे, रेणुका जामकर, उषा जामकर, अंकिता मावसकर, कृष्णा मावस्कर यांच्यासह मेळघाटातील अनेक नागरिक उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *