![]()
अंजनगाव सुर्जी शहरातील आठवडी बाजार परिसरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री रोहित ॲग्रो एजन्सीचे कृषी गोडाऊन आणि शेजारील देशी दारूचे दुकान फोडले. ही घटना आज, मंगळवारी सकाळी उघडकीस आली. चोरी करणारे दोन अज्ञात चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे २.४० वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी लोखंडी रॉडच्या सहाय्याने दोन्ही दुकानांचे शटर वाकवून आत प्रवेश केला. त्यांनी रोहित ॲग्रो एजन्सीच्या गोडाऊनमधून खतांच्या व कीटकनाशकांच्या पेट्या लंपास केल्या. त्यानंतर चोरट्यांनी शेजारील सरकारी देशी दारूच्या दुकानातून अंदाजे ३० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. देशी दारूच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन अज्ञात चोरटे चोरी करताना स्पष्टपणे दिसले आहेत. मात्र, कृषी गोडाऊनचा सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्यामुळे त्या ठिकाणचे दृश्य उपलब्ध झाले नाही. आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास काही नागरिकांना दुकानांचे शटर फोडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ गोडाऊन मालक सुधाकर टिपरे यांना माहिती दिली. त्यानंतर टिपरे आणि देशी दारू दुकानाच्या संचालकांनी अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि चोरीचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
Source link
अंजनगाव सुर्जीमध्ये कृषी गोडाऊन, दारूचे दुकान फोडले:चोरटे सीसीटीव्हीत कैद, रोकडसह खत-कीटकनाशके लंपास