![]()
मासोद गावात गेल्या अनेक वर्षांपासून बाहेरून आणून टाकण्यात येणाऱ्या राखेमुळे येथील नागरिकांचे जीवन अक्षरशः धुळीला मिळाले आहे. राखेच्या प्रचंड प्रदूषणामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न कमालीचा गंभीर बनला आहे. या विरोधात आता मासोदकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रशासनाने यावर तातडीने कारवाई न केल्यास ६ जूनपासून तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर टाकण्यात येणारी राख वाऱ्यामुळे उडून संपूर्ण गावात पसरते. अनेकदा धुळीचे साम्राज्य इतके वाढते की समोरील रस्तेही दिसेनासे होतात. यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. त्यामुळे गावात अनेक लहान-मोठे अपघात घडले आहेत. गावात बाहेरून राख आणणे व टाकणे तात्काळ बंद करावे. आधीच साठवून ठेवलेल्या राखेची योग्य विल्हेवाट लावावी. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यासोबतच, ग्रामपंचायतीने ग्रामसभा व मासिक बैठकीत याबाबत कायदेशीर ठराव मंजूर करावा. संबंधितांना नोटीस बजावावी. अशीही मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढला नाही तर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. निवेदन सादर करताना गिरीश चौधरी, सामाजिक कार्यकर्ते राहुल पुरी, सूरज गवळी, गौरव नंदनवार, अविनाश मसराम, अक्षय कुंभरे, अनिकेत सुनकर, अभिषेक उमक, अनिकेत वैद्य, महेश केवतकर यांच्यासह मासोद गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य धोक्यात आले धोक्यात; कारवाई हवी मासोद गावातील राख प्रदूषणाचा प्रश्न हा नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत गंभीर विषय आहे. गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन गावात राख आणणे व टाकणे कायमस्वरूपी बंद करावे. अन्यथा ०६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनापासून गावकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी तीन दिवसांचे अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. – गिरीश चौधरी, समाजसेवक.
Source link
राखेच्या धुळीने मासोद गावचा श्वास गुदमरला:आरोग्यासह पर्यावरण धोक्यात; ग्रामस्थ आक्रमक, प्रशासनास दिले निवेदन