![]()
लोणी टाकळी येथील ज्ञानेशकन्या श्री संत गुलाबराव महाराज संस्थान (जन्मस्थान), येथे जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विविध धार्मिक कार्यक्रमांसह या जन्मोत्सवाचा समारोप आज, शनिवारी आषाढी शुद्ध एकादशीच्या निमित्ताने करण्यात आला. सप्ताहादरम्यान दररोज सकाळी नित्य स्थापना, दुपारी गुलाब गौरव पारायण, सायंकाळी हरिपाठ आणि भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यात परिसरासह विविध भागांतून आलेल्या भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संतांचे दर्शन घेतले. संत गुलाबराव महाराजांच्या विचारांचा प्रसार व्हावा आणि समाजात अध्यात्मिक जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने विविध धार्मिक उपक्रम राबविण्यात आले. समारोपाच्या दिवशी मूर्ती अभिषेक, वेद विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून वेदपठण, पालखी सोहळा, संत गुलाबराव महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा परिसरातील भाविकांनी लाभ घेतला. जन्मोत्सवादरम्यान संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला असून, संतांच्या विचारांचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात हा सोहळा यशस्वी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन संस्थान आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थानचे पदाधिकारी, ग्रामस्थ, स्वयंसेवक आणि भाविकांनी विशेष परिश्रम घेतले.
Source link
श्रीक्षेत्र लोणी टाकळी येथे जन्मोत्सवाचा समारोप:धार्मिक पालखी सोहळा, भाविकांना केले महाप्रसादाचे वितरण