Headlines

'मराठा आरक्षणाबाबत सरकारने दिलेला प्रत्येक शब्द पाळला':मनोज जरांगेंनी उपोषण टाळावे, शंभूराज देसाईंचे आवाहन; रोहित पवारांनाही प्रत्युत्तर




मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या शब्दापासून सरकार अजिबात मागे हटलेले नसून, हैदराबाद गॅझेटमधील कुणबी नोंदी मिळवून उपसमितीने आपले आश्वासन पूर्ण केले असल्याचे स्पष्टीकरण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या ‘सत्य सांगण्याच्या’ आव्हानावर प्रतिक्रिया देताना त्यांनी ही भूमिका मांडली. तसेच, गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपले नियोजित उपोषण टाळावे असे आवाहन करतानाच, सरकारची चर्चेची दारे त्यांच्यासाठी नेहमीच उघडी असल्याचेही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. आमदार रोहित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत सत्य समोर आणण्याचे आव्हान दिल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना त्यांना थेट प्रत्युत्तर दिले आहे. मराठा आरक्षणाच्या उपसमितीचा सदस्य या नात्याने सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संवादात दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पाळला असल्याचे स्पष्ट करत त्यांनी रोहित पवारांचे आरोप फेटाळून लावले. हैदराबाद गॅझेट मिळवून कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीने मोठे काम केले असून, या सर्व नोंदी मिळवून समितीकडे सोपवण्याचे काम सरकारने अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडले आहे, त्यामुळे ‘शंभूराज देसाईंनी काय केले’ हे रोहित पवारांनी थेट मनोज जरांगे पाटील यांनाच विचारावे, असे खडे बोलही मंत्री देसाई यांनी सुनावले. सातारा व औंध गॅझेट लागू करण्याच्या मागणीबाबत बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर न्यायालयात याचिका दाखल होऊन कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे नव्या निर्णयाचा जुन्या प्रकरणावर परिणाम होऊ नये, यासाठी अ‍ॅडव्होकेट जनरल आणि वरिष्ठ कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल. मराठा आरक्षणाबाबतच्या अनेक मागण्या सोडवण्यात आल्या असून उर्वरित प्रश्नांवरही सकारात्मकतेने काम सुरू आहे. मुंबईतील गणेशोत्सव हा जागतिक पातळीवर आणि अत्यंत उत्साहात साजरा होणारा मोठा सण आहे. या सणासुदीच्या काळात मुंबईकर आणि बाहेरून येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण करू नये, अशी नम्र विनंती मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि राज्य शासनाच्या वतीनेही त्यांना हे उपोषण टाळण्याचे आवाहन करण्यात आले असून, आंदोलकांशी संवाद साधण्यासाठी सरकारची चर्चेची दारे कायम उघडी असल्याचे मंत्री देसाई यांनी आवर्जून स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *