![]()
जिल्हा परिषदेचे सीईओ सत्यम गांधी यांनी विकासकामांमध्ये गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. कामांना गती देऊन ती वेळेत पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या विकासात अभियंत्यांची भूमिका खूप महत्त्वाची असून, तांत्रिक कौशल्यासोबतच कामात जबाबदारी, पारदर्शकता आणि गुणवत्ता राखणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी अभियंता दिन साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांतील अभियंत्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून सीईओ गांधी बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, कार्यकारी अभियंता नीला वंजारी (बांधकाम विभाग), स्नेहा धावडे (ग्रामीण पाणीपुरवठा विभाग) आणि सुनील जाधव (मृद व जलसंधारण विभाग) उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यशवंत लवटे, कार्यकारी अभियंता श्रीकांत आवंदकर आणि प्रेम शिंदे हे देखील उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात हा कार्यक्रम झाला. यात नवीन आणि पदोन्नती मिळालेल्या अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला. वर्षभरात सेवानिवृत्त झालेले आणि रक्तदान सारख्या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी झालेल्या आजी-माजी अभियंत्यांचाही गौरव करण्यात आला. गांधी यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना सर्व अभियंत्यांना पुढील कामांसाठी आणि जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. इतर मान्यवरांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात यादव तरटे यांचे ‘ऐकण्याची कला’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. अतुल रामटेके यांनी प्रास्ताविकातून अभियंता दिनाचे महत्त्व आणि अभियंत्यांची विकास प्रक्रियेतील भूमिका याबद्दल माहिती दिली. प्राजक्ता मशीदकर यांनी सूत्रसंचालन केले, तर अतुल रामटेके यांनी आभार मानले. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील अभियंते, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभियंता दिनानिमित्त रक्तदान शिबिरही घेण्यात आले. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करून त्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. जिल्हा परिषद सेवेत नव्याने रुजू झालेल्या, पदोन्नती मिळालेल्या आणि सेवानिवृत्त अभियंत्यांचाही सत्कार करण्यात आला.
Source link
गुणवत्तेला प्राधान्य देऊन निर्धारित वेळेत कामे पूर्ण करा:सीईओ गांधींचे आवाहन, अभियंता दिनी जि.प. मध्ये अभियंत्यांचा सत्कार, रक्तदात्यांचा गौरवही