![]()
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील झिल्पा शिवारात गौराई विसर्जनावेळी दोन १३ वर्षीय मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (१५ सप्टेंबर) सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. आयुष हरीश कुमरे आणि दर्शन धनराज लाड (दोघेही रा. झिल्पा) अशी मृत बालकांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, झिल्पा गावातील महिला मंगळवारी गौराई विसर्जनासाठी शिवारातील तलावावर गेल्या होत्या. त्यांच्यासोबत काही मुलेही तलावाच्या पाण्यात उतरली होती. गौराई विसर्जनाची प्रक्रिया सुरू असतानाच आयुष आणि दर्शन हे दोघे पाण्यात बुडाले. ते दोघे दिसत नसल्याचे लक्षात येताच उपस्थित महिलांनी मदतीसाठी आवाज दिला. यामुळे घटनास्थळी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थ तलावाकडे धावले. आयुषचे काका आणि दर्शनचे काका यांनी लगेच पाण्यात उतरून दोघांचा शोध घेतला. काही प्रयत्नांनंतर दोन्ही मुलांना पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने काटोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच काटोल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. आयुष आठवीत, तर दर्शन सातवीत शिकत होता. दोघेही जय भवानी क्रीडा मंडळाचे कबड्डी खेळाडू होते. या दोन्ही मुलांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्यांच्या मित्रपरिवाराला आणि क्रीडा क्षेत्राला धक्का बसला आहे.
Source link
नागपुरात गौराई विसर्जनाला गालबोट:दोन 13 वर्षीय मुलांचा तलावात बुडून मृत्यू, काटोल तालुक्यातील झिल्पा शिवारातील दुर्दैवी घटना