Headlines

पुण्यात आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषदेचे आयोजन:17 ऑक्टोबर रोजी चिंचवडमध्ये होणार, व्हिएतनामसह अनेक देशांतील भिक्खुनी सहभागी होणार




विस्डम इन मोशन फोरम आणि कॅटलिस्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषद- पुणे २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद १७ ऑक्टोबर रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात होणार आहे. या परिषदेसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी नोंदणी करावी, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे. समितीमध्ये प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ. उज्ज्वला आंदुरकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. संध्या हरिभक्त, डॉ. वैशाली भामरे आणि पाली व बौद्ध अध्ययनाच्या अभ्यासक लक्ष्मीकांता माने यांचा समावेश आहे. व्हिएतनाम, श्रीलंका, कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि भारतातील नामांकित भिक्खुनी तसेच विविध क्षेत्रांतील अभ्यासक या परिषदेत वक्ते आणि चर्चासत्रातील सदस्य म्हणून सहभागी होतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने १९४२ मध्ये ‘ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस वुमेन्स कॉन्फरन्स’ ही ऐतिहासिक महिला परिषद नागपूर येथे झाली होती. २० जुलै १९४२ रोजी झालेल्या या परिषदेत महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय हक्कांवर चर्चा झाली होती. त्याच ऐतिहासिक परंपरेपासून प्रेरणा घेऊन, पुण्यात पहिल्यांदाच अशा आंतरराष्ट्रीय बौद्ध महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे आयोजन महिलांनी केले असून, वक्त्यांमध्येही महिलांचा प्रमुख सहभाग आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. परिषदेत सहभागी होण्यासाठी www.thewisdominmotion.org या संकेतस्थळावर जाऊन प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. या परिषदेत भिक्खुनी संघाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या बौद्ध महिलांच्या प्रवासाचा आढावा घेतला जाईल. बौद्ध महिलांचे योगदान, नेतृत्व, शिक्षण, सामाजिक बदल आणि सध्याची आव्हाने यांवरही विविध सत्रांमध्ये चर्चा होईल. आयोजकांनी सांगितले की, ‘भिक्खुनी संघाविषयीची बुद्धांची दूरदृष्टी आणि समानता व सामाजिक न्यायासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कटिबद्धता यांपासून प्रेरणा घेऊन ही परिषद आयोजित केली जात आहे. भिक्खू-भिक्खुनी, अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ, व्यावसायिक आणि समाजनेते यांना एका व्यासपीठावर आणणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.’ ‘प्रत्येक संवादात सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता असते, असा आमचा विश्वास आहे. ‘विस्डम इन मोशन फोरम’ असा एक जागतिक समुदाय तयार करू इच्छिते, जिथे ज्ञानाची देवाणघेवाण परिषदेच्या पलीकडे जाईल आणि विविध पिढ्यांमधील संवादाला प्रोत्साहन मिळेल,’ असेही आयोजकांनी म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *