मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याची भूमिका कायम ठेवल्याने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली असतानाही जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आ
.
त्याचवेळी दिशा सालियान प्रकरणात सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर या प्रकरणावरही भरत गोगावले यांनी भाष्य केले. दिशा सालियान यांचे वडील सतीश सालियान यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच इतरांची नावे तपासात आली असली तरी चौकशी यंत्रणा आपले काम करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘कर नाही त्याला डर कशाला? आदित्य ठाकरेंनी चौकशीला सामोरे जावे,’ अशी थेट भूमिका त्यांनी मांडली.
जरांगे मुंबईत आले तर सरकार सामोरे जाणार
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मुंबई, ठाणे आणि पुणे परिसरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने आंदोलनामुळे उत्सवात अडथळा निर्माण होऊ नये, अशी सरकारची भूमिका आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.
या निर्णयाबाबत बोलताना भरत गोगावले म्हणाले की, मुंबईमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्ताची जबाबदारी आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आणखी एका मोठ्या आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, अशी सरकारची भूमिका आहे.
“गणेशोत्सवाचे मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये मोठे कार्यक्रम सुरू आहेत. अशा परिस्थितीत या गडबडीमध्ये त्यांनी येऊ नये, असे सरकारला वाटते. मात्र, ते आलेच तर सरकार म्हणून आम्ही जे काही सामोरे जायचे आहे, त्याला सामोरे जाऊ,” असे गोगावले यांनी स्पष्ट केले.
परवानगीचा निर्णय पुन्हा विचाराधीन
पोलिसांनी यापूर्वी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा अर्ज नाकारला आहे. मात्र, त्यांच्या सहकाऱ्यांकडून पुन्हा परवानगीसाठी अर्ज करण्यात आल्याची माहिती आहे. या अर्जावर पोलीस कायद्याच्या चौकटीत आणि परिस्थितीचा विचार करून निर्णय घेतील, असे गोगावले यांनी सांगितले. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सूचित केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह सरकार यावर पुढील भूमिका ठरवेल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे गणेशोत्सवाच्या काळात सामान्य नागरिक, गणेशभक्त आणि वाहतुकीला कोणताही त्रास होऊ नये, यावर सरकारचा भर असल्याचेही गोगावले यांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट झाले.
मराठा समाजासाठी 13 पैकी 12 मागण्या मान्य
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने आतापर्यंत काय भूमिका घेतली, यावरही भरत गोगावले यांनी भाष्य केले. जरांगे पाटील यांनी एकूण 13 मागण्या केल्या होत्या. त्यापैकी 12 मागण्या मान्य झाल्याचा दावा त्यांनी केला. “ज्या मागण्या कायदेशीर होत्या, त्या सगळ्या मान्य झालेल्या आहेत. जी मागणी पूर्ण करता येत नव्हती, त्यामागे कायद्याची अडचण काय आहे, न्यायालयात प्रकरण काय आहे आणि अॅडव्होकेट जनरलचे मत काय आहे, हे त्यांना समजावून सांगण्यात आले आहे,” असे गोगावले म्हणाले. न्यायालयीन प्रक्रियेच्या विरोधात जाऊन निर्णय घेतल्यास त्याचा मराठा समाजालाच फटका बसू शकतो, हेही सरकारने स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आंदोलनाची दिशा योग्य पद्धतीने ठेवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आमच्या नेत्यांवर टीका करा, महाराष्ट्राला सगळं माहिती
मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सत्ताधारी नेत्यांवर होणाऱ्या टीकेबाबतही गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारकडून वारंवार टीका-टिप्पणी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही टीका केली जात असेल तर त्याला सामोरे जाण्याची सरकारची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत. आम्ही त्यांना सामोरे जायला तयार आहोत. आमच्या नेत्यांची कामगिरी काय आहे, हे महाराष्ट्राला आणि देशालाही माहिती आहे,” असे गोगावले म्हणाले. मराठा समाजासाठी सरकारने जे काही देता येईल ते दिले असून, पुढेही कायदेशीर चौकटीत आणखी काही करता येत असेल तर करण्याची सरकारची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिशा सालियान प्रकरणावरही गोगावले स्पष्ट बोलले
दरम्यान, दिशा सालियान प्रकरणावरूनही भरत गोगावले यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. दिशा सालियान यांच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयने एफआयआर दाखल केला असून, त्यांच्या वडिलांनी सतीश सालियान यांनी काही राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि तपास यंत्रणांशी संबंधित व्यक्तींविषयी गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह इतरांची नावे चर्चेत आली आहेत. याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता, गोगावले यांनी थेट चौकशीला सामोरे जाण्याची भूमिका मांडली. “चौकशी करणारे अधिकारी आहेत, ते चौकशी करतील. चौकशीत काही निष्पन्न झाले तर ते समोर येईल आणि काही निष्पन्न झाले नाही तर तेदेखील स्पष्ट होईल. त्यामध्ये काळजी करण्याचे कारण नाही,” असे ते म्हणाले.
कर नाही त्याला डर कशाला?
दिशा सालियान प्रकरणावर बोलताना गोगावले यांनी “कर नाही त्याला डर कशाला?” असा सवाल उपस्थित केला. “ज्याला काही करायचे नाही, त्याला घाबरण्याचे कारण नसते. त्यामुळे त्यांनी चौकशीला सामोरे जावे, एवढेच आमचे म्हणणे आहे,” असे गोगावले यांनी स्पष्ट केले. सीबीआयकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असल्याने तपास पूर्ण होण्यापूर्वी त्यावर निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचेही त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट झाले.
आता जरांगे यांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष
एकीकडे मुंबईतील गणेशोत्सव आणि दुसरीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न यामुळे सरकारसमोर कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली असली तरी जरांगे पाटील मुंबईकडे येण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले तर सरकार काय भूमिका घेणार, नव्याने करण्यात आलेल्या परवानगी अर्जावर पोलीस काय निर्णय घेणार आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाला कोणत्या अटी लागू केल्या जाणार, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागण्यांपैकी बहुतांश मागण्या मान्य झाल्याचा सरकारचा दावा आहे, तर उर्वरित मागण्यांवर कायदेशीर अडचणी असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. त्यामुळे सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष आता पुन्हा रस्त्यावर येणार की चर्चेतून मार्ग निघणार, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा…
6 वर्षे वाट पाहिली, अखेर देवाने न्याय दिला!: दिशा सालियानच्या वडिलांचा खळबळजनक खुलासा; CBIकडे थेट आदित्य ठाकरेंसह दिग्गजांची नावे दिली

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियान हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता अत्यंत गंभीर आणि नाट्यमय वळण लागले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अखेर या प्रकरणात गुन्हा (FIR) दाखल करून सखोल तपासाला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर दिशाचे वडील सतीश सालियान यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना अत्यंत खळबळजनक दावे केले आहेत. “आम्ही 6 वर्षे न्यायासाठी वाट पाहिली, अखेर देवाने आम्हाला हा दिवस दाखवला,” अशी भावनिक प्रतिक्रिया देत त्यांनी सीबीआयकडे नोंदवलेल्या जबाबात शिवसेना नेते आदित्य ठाकरे, अभिनेते डिनो मोरिया, सूरज पांचोली यांच्यासह अनेक बड्या व्यक्तींची नावे थेट दिल्याचे उघड केले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
दिशा सालियान प्रकरणात ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल: बावनकुळेंचा विश्वास, समान नागरी कायद्यावरून विरोधकांवर साधला निशाणा

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिशा सालियान प्रकरण, समान नागरी कायदा (UCC) आणि राज्यातील दुष्काळ या मुद्द्यांवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. “दिशा सालियान प्रकरणात सीबीआय चौकशीतून ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल,” असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी समान नागरी कायद्यावरून विरोधकांवर सडकून टीका केली. तसेच, राज्यातील १८ दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा अहवाल आज कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांना सादर करणार असल्याची महत्त्वपूर्ण माहितीही त्यांनी दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी
संजय राऊतांचा सरकारवर घणाघात: म्हणाले- दिशा सालियानची फाईल ओपन करणं, हा तर जरांगेंच्या आंदोलनावरून लक्ष वळवण्याचा डाव

दिशा सालियन प्रकरणातील एफआयआर, मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच महाराष्ट्राबाबत केलेले विधान, या तिन्ही मुद्द्यांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. दिशा सालियन प्रकरणाचा तपास आणि बातम्या या पूर्णपणे ‘मॅनेज’ असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
दिशा सालियान किंवा आदित्य ठाकरेंना कधी भेटलोच नाही!: CBI चौकशीच्या पार्श्वभूमीवर अभिनेता सूरज पांचोलीचा मोठा खुलासा

दिवंगत दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची सूत्रे सीबीआयकडे (CBI) गेल्यानंतर या प्रकरणाला पुन्हा एकदा नवे वळण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सीबीआयने दाखल केलेल्या प्राथमिक चौकशीत बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील नावांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. या प्रकरणात वारंवार नाव ओढले जात असल्याने बॉलिवूड अभिनेता सूरज पांचोली याने अखेर मौन सोडले असून, सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहीत शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि दिशा सालियान यांच्याविषयी अत्यंत मोठा आणि थेट खुलासा केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी