Headlines

मनोज जरांगेंना मुंबईत आंदोलनाची परवानगी नाहीच:मुंबई पोलिस भूमिकेवर ठाम, आदेशाचे पालन न केल्यास गुन्हा दाखल होणार




सलग दोन वेळा परवानगी नाकारूनही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. दोन दिवसांपासून पाणी आणि उपचार सोडल्याने जरांगेंची तब्येत अत्यंत खालावलेली असतानाही, ते आज आंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना झाले आहेत. मात्र गणपती उत्सवामुळे मुंबईत येण्याची परवानगी नाकारण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी दोन वेळा मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारली होती. आता पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या कारणास्तव मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा परवानगी नाकारली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईच्या वेशीवरच अडवला जाण्याची शक्यता आहे. सध्या राज्यभर गणेशोत्सवाचा उत्साह असून मुंबईत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. मुंबईतील मनाचे गणपती तसेच सार्वजनिक गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी भाविक आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभवू नये म्हणून मुंबई पोलिसांनी त्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. तसेच जमावबंदीच्या आदेशानुसार जर कोणाला आंदोलन करायचे असेल तर रीतसर पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. आदेशाचे पालन न केल्यास गुन्हा दाखल होणार न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईत केवळ आझाद मैदानावरच अटी व शर्तींच्या अधीन राहून आंदोलनास परवानगी दिली जाते. त्यामुळे रीतसर परवानगी न घेता किंवा गनिमी काव्याचा वापर करून आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करत थेट गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. याच कायदेशीर पार्श्वभूमीवर, सध्या मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांकडून मुंबईच्या वेशीवरच अडवले जाण्याची दाट शक्यता आहे. मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, अंतरवाली सोडताना झाले भावूक मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील उपोषणाचे ठिकाण सोडले असून, ते आता मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी रवाना झाले आहेत. अंतरवालीतून निघताना गाडीत बसताच त्यांना अश्रू अनावर झाल्याने ते प्रचंड भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना त्यांनी आपली ठाम भूमिका स्पष्ट केली असून, समाजाच्या लेकरांच्या भवितव्यासाठी आपला हा लढा अविरत सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच, कोणत्याही परिस्थितीत सरकारला शरण न जाता मराठा आरक्षणाची पूर्ण अंमलबजावणी होईपर्यंत आपण माघार घेणार नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे. ही देखील बातमी वाचा.. राज्यात लवकरच समान नागरी कायदा लागू होणार:एकनाथ शिंदेंनी दिले संकेत; मराठा आरक्षणावर म्हणाले- जरांगेंनी मुंबईत येण्याबाबत पुनर्विचार करावा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पाटील, दिशा सालियन प्रकरणातील एफआयआर आणि राज्यात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याबाबत सुरू असलेली चर्चा, या सर्व प्रश्नांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारने मराठा समाजाला भरघोस सवलती दिल्या असून, गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे. इथे सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *