Headlines

वक्फ जमिनींच्या व्यवहारात अनियमितता:सलीम मुल्लांचा 96 हजार एकर जमिनीच्या गैरवापराचा आरोप; कागदपत्रांसह चौकशीची मागणी




महाराष्ट्रात वक्फ बोर्डाच्या ९६ हजार एकर जमिनीच्या व्यवहारात अनियमितता असल्याचा आरोप वक्फ टास्क फोर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम मुल्ला यांनी केला आहे. या सर्व व्यवहारांची कागदपत्रांसह सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली. या जमिनीचा समाजाच्या हितासाठी योग्य वापर होत नसल्याचेही त्यांनी सांगितले. वक्फ जमिनी आणि मालमत्तांचे संरक्षण व्हावे, तसेच त्यांचा उपयोग समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी व्हावा, या उद्देशाने राज्य सरकारने २०१६ मध्ये वक्फ मंडळासंदर्भात अध्यादेश काढला होता. मात्र, प्रशासनाने या अध्यादेशाची अंमलबजावणी केली नाही. उलट, काही अधिकारी आणि संबंधित लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप मुल्ला यांनी केला. वक्फ बोर्डाच्या काही सदस्यांकडूनही गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार केला जात असल्याचा दावा मुल्ला यांनी केला. पुण्यातील बाणेर परिसरातील वक्फ जमिनीच्या गैरव्यवहाराचे प्रकरण त्यांनी उघडकीस आणले होते. या प्रकरणात वक्फ बोर्डाचे माजी सदस्य समीर काझी यांच्या भूमिकेवर प्रश्न विचारल्यानंतर आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोपही मुल्ला यांनी केला. या आरोपांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. वक्फ जमिनींची बनावट किंवा खोटी कागदपत्रे तयार करून परस्पर विक्री करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रशासनाने वक्फ मालमत्तांचे मूळ अभिलेख, मालकी हक्क, आर्थिक नोंदी, प्रशासकीय आदेश आणि व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. गैरव्यवहारात सहभागी असलेल्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असेही ते म्हणाले. वक्फ मालमत्ता कोणत्याही व्यक्तीच्या खासगी किंवा वैयक्तिक फायद्यासाठी नसून त्या समाजाच्या कल्याणासाठी आहेत, असे मुल्ला यांनी स्पष्ट केले. या जमिनींवर शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, रुग्णालये आणि रोजगाराभिमुख उपक्रम उभारले जावेत, अशी त्यांची मागणी आहे. सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणून वक्फ जमिनींचे संरक्षण करावे, असेही त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *