![]()
प्रख्यात मराठी सुगम संगीत गायिका अनुराधा मराठे (सविता नेने) यांच्या 75 वर्षांच्या संगीत प्रवासाचा पुणे फेस्टिव्हलतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते मंगळवारी नवी पेठेतील पत्रकार भवन येथे हा सत्कार झाला. यावेळी मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, ॲड. अभय छाजेड, नगरसेवक सुनील शिंदे आणि मोहन टिल्लू उपस्थित होते. ज्येष्ठ निवेदिका मंजिरी धामणकर यांनी अनुराधा मराठे यांच्या संगीत प्रवासावर प्रकट मुलाखत घेतली. यावेळी मराठे यांनी आपल्या संगीत प्रवासातील आठवणी सांगितल्या. त्यांनी गुरू आणि कुटुंबीयांनी दिलेल्या संस्कारांना विशेष महत्त्व दिले. त्या म्हणाल्या, “मी वयाच्या सातव्या वर्षी डॉ. श्रीपाद नाईक यांच्याकडे पाच रुपये फी देऊन गायन शिकायला सुरुवात केली. नंतर कुटुंबाच्या आग्रहामुळे गायन बंद केले. पण माझे गुरू स्वतः घरी आले आणि त्यांनी मला पुन्हा गायनाकडे आणले. त्यानंतर त्यांनी 17 वर्षे कोणतीही फी न घेता मला प्रशिक्षण दिले.” “सहा तास रियाज केला तरच तीन तास व्यवस्थित गाता येते,” हा गुरूंचा मंत्र आयुष्यभर उपयोगी ठरल्याचे अनुराधा मराठे यांनी सांगितले. गुरूंनी त्यांना गायनासोबत तबलाही शिकवला. सूर आणि ताल यांचा समतोल, बंदिशीतील शब्दांची स्पष्टता आणि गायनातील बारकावे यावर त्यांनी मार्गदर्शन केले. नव्या पिढीतील गायिकांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी ‘पलट्या’ हे यूट्यूब चॅनेल सुरू केल्याचेही सांगितले. अनुराधा मराठे यांनी वयाच्या 16व्या वर्षी मैफलींना सुरुवात केली. त्यांना 91 संगीतकारांसोबत गायन करण्याची संधी मिळाली. प्रत्येक संगीतकाराकडून काहीतरी शिकता आले, असे त्यांनी नमूद केले. लता मंगेशकर यांच्यासमोर ‘तरुण आहे रात्र अजून’ हे गाणे सादर केल्यानंतर मिळालेली शाबासकी हा भारतरत्न मिळाल्यासारखा अनुभव होता, असे त्यांनी सांगितले. आशा भोसले यांनीही ‘ज्ञानेश्वरी’च्या गायनावेळी बारकावे शिकवल्याची आठवण त्यांनी सांगितली. यावेळी त्यांनी ‘लाज शरम तो को नाही’ आणि ‘सखी बघ अघटीत घडले’ यांसारख्या रचना सादर केल्या. कृष्णकुमार गोयल म्हणाले, “अनुराधा मराठे यांचा सत्कार म्हणजे त्यांच्या अखंड संगीत प्रवासाचा सन्मान आहे. कलाकाराचा सन्मान हा संपूर्ण संगीत क्षेत्राचा सन्मान असतो.” विद्यार्थ्यांनी स्वर आणि ताल पक्के करून गाणे आत्मसात करावे, असा संदेश मराठे यांनी यावेळी दिला.
Source link
गायिका अनुराधा मराठे यांच्या 75 वर्षांच्या संगीतसाधनेचा सन्मान:पुणे फेस्टिव्हलतर्फे सत्कार; गुरुंनी 17 वर्षे फी न घेता शिकवले