![]()
माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांची मंगळवारी अचानक प्रकृती बिघडल्याचे समोर आले आहे. परळीत जनता दरबार सुरू असतानाच मुंडे यांची अचानक तब्येत बिघडली व त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परळी येथील शासकीय विशेष अतिथीगृहात मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे आमदार धनंजय मुंडे यांचा ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला होता. मात्र, हा दरबार सुरू असतानाच त्यांना अचानक त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तातडीने अतिथीगृहाशेजारी असलेल्या एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टरांनी त्यांची आवश्यक वैद्यकीय तपासणी केली असून पुढील उपचार सुरू केले आहेत, तसेच डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहेत. ‘बेल पाल्सी’ आजाराचाही केला होता सामना यापूर्वी फेब्रुवारी 2025 मध्ये धनंजय मुंडे यांना चेहऱ्याच्या स्नायूंशी संबंधित असलेल्या ‘बेल पाल्सी’ नावाच्या आजाराला सामोरे जावे लागले होते. या आजारामुळे त्यांच्या बोलण्यावरही परिणाम झाला होता. त्यातून सावरल्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांनी स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्ती आणि वजन कमी करण्याबाबत मिश्किल टिप्पणी केली होती, ज्याची मोठी चर्चा झाली होती. वजन घटवण्याबाबत केले होते विधान 1 ऑगस्ट रोजी परळीत झालेल्या एका खासगी कार्यक्रमात त्यांनी आपल्या फिटनेस प्रवासाविषयी माहिती दिली होती. “गेल्या दीड वर्षापासून लोक भेटल्यावर ‘भाऊ, तब्येत कशी आहे?’ असा एकच प्रश्न विचारायचे. हे ऐकून कंटाळल्याने मी स्वतःमध्ये बदल घडवण्याचा निर्धार केला आणि नियमित जिम करून वजन कमी केले,” असे मुंडे म्हणाले होते. तसेच, “काही काळ माझे सर्वच क्षेत्रात ‘वजन’ कमी झाले होते. मात्र येणारा काळ आपलाच असल्याने पुढील काळात तंदुरुस्त अन् फिट राहणे आवश्यक आहे,” असे सूचक विधानही त्यांनी केले होते, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. याच कार्यक्रमात बोलताना आमदार धनंजय मुंडे यांनी एक खंतही बोलून दाखवली होती. “आम्ही दोघे बहीण-भाऊ एकाच वेळी मंत्री झालो होतो, पण ते चित्र फार काळ टिकले नाही आणि दुर्दैवाने एकाला घरी बसावे लागले,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र, “पंकजा असो, मी असो किंवा आमचे असंख्य कार्यकर्ते असोत; पद आणि प्रतिष्ठेपेक्षा या भागातील जनतेशी असलेले आमचे रक्ताचे नाते अधिक महत्त्वाचे आहे,” अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली होती. ही देखील बातमी वाचा.. सर्व क्षेत्रांतील आपलं वजन कमी झालं होतं,पण येणारा काळ आपलाच:धनंजय मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा, म्हणाले- महापुरुषांना जातीत बांधू नका मी स्वत: व्यायाम करत माझे वजन कमी केले असेही आपले सर्वच क्षेत्रातील वजन कमी झाले होते, पण येणारा काळ आपला आहे, त्यामध्ये आपण अतिशय फिट राहायला पाहिजे यासाठी मी आता जीम करतो, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. मागच्या दीड वर्षांमध्ये माझ्या जीवलग सहकाऱ्यांनी सुद्धा मला भेटल्यावर एकच प्रश्न केला भाऊ तब्बेत कशी आहे? हे ऐकूण मी परेशान झालो आणि ठरवले की आता चमत्कार दाखवावा लागेल. इथे सविस्तर वाचा
Source link
आमदार धनंजय मुंडे यांची प्रकृती अचानक बिघडली:परळीतील जनता दरबारातच सुरू झाला त्रास; उपचारासाठी रुग्णालयात दाखल