![]()
जळगाव जिल्ह्यातील जामनेर-पहूर रस्त्यावरील शेंदुर्णीजवळ शालेय पोषण आहाराची वाहतूक करणाऱ्या 407 टेम्पोला एक भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या वाहनाचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव गाडी थेट रस्त्यावरच उलटली. या भीषण अपघातात टेम्पोमधील पोषण आहाराच्या गोण्यांवर बसलेले जगदीश लालचंद पाटील (रा. कृष्णापुरी, पाचोरा) आणि अर्जुन तुकाराम पाटील (रा. बहिरम नगर, पाचोरा) हे दोन हमाल बाहेर फेकले गेले. अत्यंत गंभीर दुखापत झाल्यामुळे या दोन्ही कामगारांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, हा शालेय पोषण आहार पाचोरा येथून लोड करून नेला जात होता. या दुर्दैवी घटनेमुळे मयत हमालांच्या कुटुंबांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन या अपघातामुळे शासकीय पोषण आहाराच्या वाहतुकीमध्ये होत असलेला गंभीर निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे. मालवाहू वाहनात कामगारांना थेट गोण्यांवर बसवून नेणे सुरक्षेच्या दृष्टीने कितपत योग्य होते, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. याशिवाय वाहनाची माल वाहून नेण्याची क्षमता किती होती, तसेच वाहनाचे फिटनेस, परमिट आणि विम्याची कागदपत्रे खरोखरच वैध होती का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर आले आहेत. सखोल चौकशीची नागरिकांची मागणी शालेय पोषण आहाराचा हा माल पाचोरा येथून नेमका कोणत्या केंद्रासाठी नेला जात होता, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. तसेच, या महत्त्वपूर्ण पोषण आहार वाहतुकीचे कंत्राट नेमके कोणाकडे होते, या सर्व बाबींची सखोल चौकशी प्रशासनाकडून करण्यात यावी, अशी आग्रही मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांकडून तपास सुरू या अपघाताची माहिती मिळताच पहूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र, केवळ टायर फुटल्याने अपघात झाला असा निष्कर्ष काढून हे प्रकरण न थांबवता, वाहतूक प्रक्रियेतील नियमभंग आणि दोन कष्टकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. यासोबतच, मृतकांच्या वारसांना शासनाकडून तातडीने योग्य आर्थिक मदत मिळावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Source link
जळगावात शालेय पोषण आहाराच्या टेम्पोला भीषण अपघात:दोन हमालांचा जागीच मृत्यू; शेंदुर्णीजवळ टायर फुटल्याने गाडी उलटली