![]()
शाळा सोडल्यानंतर शाळेच्या रेकॉर्डमध्ये किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्यात झालेली चूक दुरुस्त करता येत नाही, अशी अनेक विद्यार्थ्यांची समजूत असते. मात्र, आता अशा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शालेय रेकॉर्डमध्ये नजरचुकीने किंवा अनवधानाने झालेली चूक विद्यार्थी शाळा सोडल्यानंतरही नियमानुसार दुरुस्त करता येऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या पूर्णपीठाने दिला आहे. या निर्णयामुळे शाळा सोडल्यानंतर दाखल्यावर नाव, जन्मतारीख किंवा इतर नोंदी चुकीच्या असल्याचे लक्षात आलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. केवळ संबंधित विद्यार्थ्याने शाळा सोडली आहे, या कारणावरून रेकॉर्डमधील दुरुस्ती नाकारता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे चुकीच्या नोंदीमुळे पुढील शिक्षण, नोकरी, व्यवसाय किंवा अन्य शासकीय प्रक्रियेत अडचणी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दुरुस्तीचा मार्ग खुला झाला आहे. नेमकं प्रकरण काय? हा निर्णय जालना जिल्ह्यातील जनाबाई हिमतराव ठाकूर यांच्या प्रकरणातून समोर आला. त्यांच्या शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रातील नोंदीत चूक असल्याने त्यांनी ती दुरुस्त करण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाकडे अर्ज केला होता. मात्र, त्यांनी शाळा सोडलेली असल्याने शालेय रेकॉर्डमध्ये दुरुस्ती करता येणार नाही, असे सांगत विभागाने त्यांचा अर्ज फेटाळला. यानंतर ठाकूर यांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान शाळा सोडल्यानंतर शालेय रेकॉर्डमध्ये दुरुस्ती करता येते की नाही, हा महत्त्वाचा कायदेशीर प्रश्न उपस्थित झाला. शासनाने कोणता नियम सांगितला? या प्रकरणात शासनाने माध्यमिक शाळा संहितेतील नियम 26.3 आणि 26.4 यांचा आधार घेतला. विद्यार्थ्याने शाळेत शिक्षण घेत असताना त्याच्या रेकॉर्डमध्ये आवश्यक दुरुस्ती करता येते; मात्र शाळा सोडल्यानंतर रेकॉर्डमध्ये बदल करता येत नाही, अशी शासनाची भूमिका होती. मात्र, याच मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठांच्या यापूर्वीच्या काही निर्णयांमध्ये वेगवेगळी मते समोर आली होती. त्यामुळे या कायदेशीर प्रश्नावर स्पष्टता आणण्यासाठी हे प्रकरण पूर्णपीठाकडे सोपवण्यात आले. पूर्णपीठाने काय स्पष्ट केले? पूर्णपीठाने या प्रकरणात विद्यार्थ्यांना दिलासा देणारी भूमिका घेतली. शालेय रेकॉर्डमध्ये झालेली चूक जाणीवपूर्वक नसून नजरचुकीने किंवा अनवधानाने झालेली असेल, तर विद्यार्थी शाळा सोडून गेला आहे, या एकाच कारणामुळे ती चूक कायम ठेवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.मात्र, दुरुस्ती आपोआप होणार नाही. संबंधित विद्यार्थ्याने चुकीची नोंद असल्याचे सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे सादर करणे गरजेचे असेल. त्यानंतर संबंधित नियमांनुसार दुरुस्तीची प्रक्रिया करता येईल. कोणत्या विद्यार्थ्यांना फायदा होणार? या निर्णयाचा फायदा प्रामुख्याने अशा विद्यार्थ्यांना होऊ शकतो, ज्यांच्या शाळेच्या रेकॉर्डमध्ये किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्यात अनवधानाने चुकीची नोंद झाली आहे. उदाहरणार्थ, नावातील चूक, जन्मतारखेतील चूक किंवा इतर शैक्षणिक नोंदीतील त्रुटी असल्यास योग्य पुराव्यांच्या आधारे दुरुस्तीची मागणी करता येऊ शकते. चुकीचा दाखला असल्यामुळे पुढील शिक्षणासाठी प्रवेश, नोकरीसाठी कागदपत्रांची पडताळणी, शासकीय योजनांचा लाभ किंवा अन्य महत्त्वाच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयामुळे अशा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दुरुस्तीचा मार्ग झाला मोकळा शाळा सोडल्यानंतर दाखल्यातील चूक दुरुस्त करण्यास बंदी असल्याच्या कारणामुळे अनेक विद्यार्थी अडचणीत येत होते. मात्र, अनवधानाने झालेली चूक असल्यास केवळ शाळा सोडल्याच्या कारणावरून दुरुस्तीची संधी नाकारता येणार नाही, हे या निर्णयातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे योग्य पुरावे सादर करून आणि संबंधित नियमांचे पालन करून शाळा सोडल्यानंतरही शालेय रेकॉर्ड किंवा दाखल्यातील चूक दुरुस्त करण्याचा मार्ग विद्यार्थ्यांसाठी खुला झाला आहे. हेही वाचा.. लातूर हादरले!:सुप्रसिद्ध शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणेंची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये मोठा खुलासा शिक्षणाची पंढरी आणि ‘लातूर पॅटर्न’साठी राज्यभरात ओळखल्या जाणाऱ्या लातूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील सुप्रसिद्ध शिक्षण संस्थाचालक संजीव चंद्रभानू सोनवणे (वय 62) यांनी राहत्या घरी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून जीवन संपवले आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर लातूरच्या शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. खासगी शिकवण्यांच्या वाढत्या प्रस्थामुळे महाविद्यालयांना लागलेली उतरती कळा आणि त्यातून आलेले नैराश्य, हे या टोकाच्या पावलामागील मुख्य कारण असल्याचे त्यांच्या मित्रपरिवाराकडून सांगण्यात येत आहे. सविस्तर वाचा..
Source link
शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त करता येणार:हायकोर्टाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा