![]()
ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना एनसीएमसी कार्डशिवाय एसटी प्रवास सवलत नाकारण्यात येणार होती. मात्र, आता ही सवलत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे ऐन सणासुदीत प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या खिशावर पडणारा ताण टळला आहे. 1 ऑक्टोबरपासून मात्र नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) असल्याशिवाय सवलतीत प्रवास करता येणार नाही. एसटी महामंडळाने 1 सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य केले होते. पण तांत्रिक अडचणी आणि सर्व्हरवरील वाढता ताण यामुळे महामंडळाने ही मुदत 15 सप्टेंबरपर्यंत वाढवली होती. आता पुन्हा 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. एनसीएमसी कार्ड अनिवार्य झाल्यानंतर मोठ्या संख्येने प्रवाशांमुळे सर्व्हरवर ताण आला होता. यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना सवलतीचे तिकीट मिळण्यात अडचणी येत होत्या. ही समस्या लक्षात घेऊन सक्षम प्राधिकरणाने मुदतवाढीला मंजुरी दिली आहे. ज्या प्रवाशांकडे आधीपासूनच ॲक्टिव्ह एनसीएमसी कार्ड आहे, त्यांना त्याच कार्डद्वारे सवलतीचे तिकीट मिळेल. महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी याबाबत सर्व प्रादेशिक व्यवस्थापक, विभाग नियंत्रक आणि आगार व्यवस्थापकांना निर्देश दिले आहेत. तसेच, सर्व वाहक आणि चालकांनाही तात्काळ सूचना देण्यास सांगितले आहे. स्थानिक विभागीय वाहतूक अधिकारी रायलवार यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. ही मुदतवाढ देण्यामागे आणखी काही कारणे आहेत. गेल्या काही दिवसांपासून सलग सुट्ट्या असल्यामुळे एनसीएमसी कार्ड तयार करणाऱ्या यंत्रणेत तांत्रिक अडचणी आल्या. अनेक प्रवाशांना नोंदणी करता आली नाही, तर काहींना नोंदणी करूनही वेळेत कार्ड मिळाले नाही. त्यामुळे ही मुदतवाढ देणे आवश्यक होते.
Source link
एसटीच्या विनाकार्ड सवलतीला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ:ऐन सणासुदीत ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना दिलासा, भुर्दंडाची वेळ टळली