Headlines

कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये थरार!:तुरुंग अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये घुसून 6 कैद्यांची मारहाण; दगडफेकीत अधिकारी जखमी, कैद्यांविरोधात गुन्हा दाखल




कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी थेट वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये घुसून मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. कारागृहात सुरू असलेला गोंधळ थांबवण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला सहा कैद्यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या घटनेत अधिकारी जखमी झाले असून पोलिसांनी सहा कैद्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नेमकं प्रकरण काय? कळंबा मध्यवर्ती कारागृहातील वरिष्ठ तुरुंग अधिकारी प्रकाश फुलचंद चव्हाण हे कर्तव्यावर असताना काही कैदी विनाकारण गोंधळ घालत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कारागृहातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चव्हाण यांनी कैद्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर सहा कैद्यांनी चव्हाण यांच्या केबिनमध्ये प्रवेश केला. कैद्यांनी त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांनी दगडफेक करत तसेच लाथाबुक्क्यांनी चव्हाण यांना मारहाण केली. या हल्ल्यात चव्हाण यांच्या हाताला दगड लागल्याने ते जखमी झाले. प्रकार लक्षात येताच इतर कारागृह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. अधिकाऱ्याच्या केबिनमध्येच कैद्यांनी हल्ला केल्याने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली. सहा कैद्यांवर गुन्हा दाखल घटनेनंतर वरिष्ठ तुरुंग अधिकारी प्रकाश फुलचंद चव्हाण यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सहा कैद्यांविरोधात शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण करणे, दुखापत करणे आणि धमकी देणे यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. हेही वाचा… राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परीक्षेचाही ‘मार्किंग पॅटर्न’ फुटला:परीक्षा रद्द करण्याची उमेदवारांची मागणी, MPSC ने दिली गैरव्यवहाराची कबुली औषध निरीक्षकपदाचा पेपर फुटल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ती परीक्षा रद्द केली होती. आता या पाठोपाठ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकपदासाठी (गट-क) घेण्यात आलेल्या मर्यादित विभागीय परीक्षेचाही मार्किंग पॅटर्न फुटल्याचे उघडकीस आले आहे. या परीक्षेतही मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप उमेदवारांकडून केला जात असून, औषध निरीक्षक परीक्षेप्रमाणेच ही परीक्षा देखील तातडीने रद्द करण्यात यावी, अशी जोरदार मागणी आता उमेदवारांमधून केली जात आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *