Headlines

निंदणासाठी मजुर मिळेना; पाच तासांसाठी 250 रु. मजुरी:परिसरामध्ये पावसाने पिकांना नवसंजीवनी‎




महान व परिसरात सुमारे १२ दिवसांच्या मोठ्या उघडीपीनंतर गत १८ जुलैपासून पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. या पावसामुळे कपाशी, सोयाबीन, तूर, उडीद, मूग आणि ज्वारी यांसारख्या खरिपाच्या पिकांना मोठी नवसंजीवनी मिळाली असून संपूर्ण परिसर हिरव्यागार पिकांनी बहरला आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने मारलेल्या दडीमुळे आणि कडक उन्हामुळे पिके कोमेजून दयनीय अवस्थेत पोहोचली होती. मात्र, १८ जुलैपासून सुरू झालेल्या समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सध्या रोजच पावसाची हजेरी सुरू असल्याने शेतांमध्ये पाणी साचून तण (गवत) वेगाने वाढले आहे. अनेक शेतकऱ्यांनी रासायनिक तणनाशकांची फवारणी टाळून पारंपरिक पद्धतीने निंदण (खुरपणी) करण्यावर भर दिला आहे. मात्र, सर्वच शेतकऱ्यांची शेतीकामे एकाच वेळी सुरू झाल्याने महान आणि लगतच्या परिसरात मजुरांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. परिणामी, मजुरांची मागणी वाढल्याने मजुरीचे दर गगनाला भिडले आहेत. महान व परिसरातील शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात सोयाबीनपेक्षा कपाशीच्या लागवडीला अधिक पसंती दिली आहे. स्थानिक कृषी सेवा केंद्रांच्या माहितीनुसार, यंदा कपाशीच्या बियाण्यांची मोठी विक्री झाली असून सोयाबीन बियाण्याची विक्री गतवर्षीच्या तुलनेत ६० टक्क्यांपर्यंत घटली आहे. विक्री न झालेले सोयाबीनचे बियाणे कृषी दुकानदारांना स्वखर्चाने कंपन्यांकडे परत पाठवावे लागले आहे. यावरून महान परिसरात यंदा सोयाबीनचे क्षेत्र घटून कपाशीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे स्पष्ट होते. यामुळे उत्पादन वाढणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *