![]()
राज्यातील जनतेला उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला असून, सध्या अनेक भागात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. उद्या मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असून, त्यानंतर तो हळूहळू पुढे सरकेल. मान्सून दाखल होण्यापूर्वीच कोकण आणि मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. आज राज्याच्या अनेक भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, तापमानाचा विचार करता राज्यात सर्वाधिक 43.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे झाली. तसेच जळगाव, धुळे, परभणी, मालेगाव, गोंदिया आणि अमरावती येथेही 41 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाचे आगमन समाधानकारक राहून, पहिल्या दोन आठवड्यांत तापमान सामान्यपेक्षा 2 अंश सेल्सिअस ते 4 अंश सेल्सिअसनी कमी राहिल्याने नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळेल. मात्र, पंधरवड्यानंतर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या तापमानात हळूहळू वाढ होऊन ते पुन्हा सामान्य पातळीवर येईल, ज्यामुळे रात्रीच्या वेळी काहीसा उकाडा जाणवू शकतो. विशेष म्हणजे, तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांनी या हवामानाचा अंदाज घेऊनच पेरणीची कामे करावीत, जेणेकरून संभाव्य नुकसान टाळता येईल. राज्यात लवकरच मान्सून होणार दाखल सध्या मान्सून लक्षद्वीप बेटे, कोमोरिन आणि अरबी समुद्रातून आपली पुढची वाटचाल करत असून, राज्यातही तो लवकरच दाखल होण्याची चिन्हे आहेत. शेतकरी राजा मान्सूनच्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असून, यंदा मान्सून वेळेवरच राज्यात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, राज्यात सध्या अनेक ठिकाणी अवकाळी पावसानेही जोरदार हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बारामतीत पूर्व मौसमी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान बारामती तालुक्यात झालेल्या पूर्वमोसमी पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, याच अस्मानी संकटात माळवाडी गावातील एका महिलेचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू तर आणखी एक महिला किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली असून, अचानक आलेल्या या पावसामुळे तालुक्यात जीवितहानीसह मोठी आर्थिक हानी झाली आहे. इगतपुरी शहर आणि तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, विशेषतः पूर्व भागातील बेलगाव तऱ्हाळे, धामणगाव, टाकेद, खेड, धामणी, समनेरा, साकूर भरवीर, पिंपळगाव डुकरा, आधारवड आणि वासळी आदी गावांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. वाढत्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा सुखद दिलासा मिळाला असला, तरी अचानक आलेल्या या पावसामुळे बाहेर पडलेल्या नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. छत्रपती संभाजीनगरातील काय परिस्थिती? छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाळी वातावरणाला सुरुवात झाली आहे. सोमवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मंगळवारी विश्रांती घेतली असली, तरी हवामान विभागाने बुधवारी (3 जून) पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. या कालावधीत शहरात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहणार असून, त्यानंतर पुढील 2 दिवसही शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. सध्या मान्सूनपूर्व स्थितीमुळे कुठे ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बुधवारी शहरात विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो. उन्हाळ्याच्या शेवटी जमिनीचे तापमान वाढल्याने स्थानिक पातळीवर कमी दाबाचा पट्टा तयार होतो. अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे कमी दाबाच्या क्षेत्राकडे खेचले जातात, तेव्हा अचानक ढग दाटून येतात. त्यामुळे संध्याकाळी मान्सूनपूर्व पाऊस पडतो. मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा वाढत्या उकाड्याने आणि ‘मे हीट’मुळे घामाघूम झालेल्या मुंबईकरांसाठी आजचा पाऊस एक मोठा दिलासा ठरला आहे. आज सकाळपासूनच दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव या पश्चिम उपनगरांसह मुंबईच्या बहुतांश भागात अचानक ढग दाटून आले आणि पावसाच्या हलक्या सरी कोसळू लागल्या. याशिवाय दादर, कुर्ला, प्रभादेवी आणि लालबाग परिसरातही ढगाळ वातावरण निर्माण झाले असून तिथेही पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या या हलक्या पावसामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला असून, गेल्या अनेक दिवसांपासून भीषण उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा आराम मिळाला आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेला अंधेरी सब-वे पावसाळ्यात हमखास 20 ते 35 वेळा पाण्याखाली जातो. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने येथे उड्डाणपूल उभारण्याचा विचार केला होता. मात्र सल्लागाराच्या अहवालानुसार हा पर्याय तांत्रिकदृष्ट्या नापास ठरला आहे. या पाणी साचण्याच्या समस्येचे मूळ मोगरा नाला असून, उगमस्थानापासून अंधेरी सब-वेपर्यंतच्या सुमारे अडीच किलोमीटर अंतरात या नाल्याला तब्बल 13 मीटरचा तीव्र उतार आहे. त्यामुळे पावसाचे पाणी अत्यंत वेगाने सब-वे परिसरात जमा होते. पालघर जिल्ह्यात पहाटेपासूनच पावसाची दमदार हजेरी दुसरीकडे, पालघर जिल्ह्यातही पहाटेपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या या मुसळधार पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पालघरच्या ग्रामीण भागातही सध्या पूर्णपणे ढगाळ वातावरण असून, येत्या काही वेळेत पावसाचा जोर आणखी वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. विदर्भातील काही भागात उकाड्याचा त्रास कायम विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिवसा आणि रात्रीच्या तापमानात सरासरीपेक्षा घट झाल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी सुखद गारवा जाणवत आहे. उन्हाचे चटके काहीसे कमी झाले असले तरी उकाड्याचा त्रास मात्र अद्याप कायम आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे तापमानात आणखी 2 ते 3 अंशांची घट होऊ शकते. या बदलत्या वातावरणामुळे पश्चिम विदर्भातील नागरिकांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळेल, मात्र पूर्व विदर्भात उकाड्याचा त्रास असाच सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी दरम्यान, सोमवारी रात्री अमरावती जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून शहरात 35.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यासोबतच अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस झाला. या पावसाळी वातावरणामुळे अकोला वगळता इतर तिन्ही जिल्ह्यांतील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या खाली आले आहे. अकोल्यात जरी 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असली, तरी तेथील रात्रीच्या तापमानात 5.5 अंशांनी लक्षणीय घट झाल्याने नागरिकांना वाढत्या तापमानापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. पूर्व विदारभात संमिश्र परिस्थिती पूर्व विदर्भातील तापमानात सध्या संमिश्र स्थिती पाहायला मिळत असून, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या खाली आले आहे. मात्र, त्याचवेळी वर्ध्यात सर्वाधिक 42 अंश, तर चंद्रपूरमध्ये 41.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे. दुसरीकडे, नागपूरचा पारा 40.7 अंशांवर असला तरी नागपूरकरांना दिवसा उन्हाचे तीव्र चटके आणि असह्य उकाड्याचा सामना करावा लागला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये तापमानात असाच चढ-उतार कायम राहण्याची आणि नागरिकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. मात्र येत्या 4 ते 6 जून दरम्यान या भागात पुन्हा एकदा पावसाळी वातावरण निर्माण होऊन काहीसा दिलासा मिळण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या काही भागांत ‘हीट वेव्ह’चे सावट जून 2026 मध्ये देशभरात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता. उत्तर-पश्चिम, ईशान्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पातील काही भागांतच समाधानकारक पावसाचा अंदाज. या काळात बहुतांश राज्यांत कमाल व किमान तापमानात वाढ होऊन उकाडा वाढणार. महाराष्ट्राच्या काही भागा उष्णतेच्या लाटेचा धोका कायम राहील, अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्राचे (मुंबई) वैज्ञानिक डॉ. सुषमा नायर यांनी दिली आहे.
Source link
राज्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी:जूनच्या पहिल्या आठवड्यात तापमानात घट; मराठवाड्यासह अनेक भागात पावसाचा जोर वाढणार