![]()
खामगाव फुलंब्री तालुक्यातील नरला येथील संपूर्ण गावाला गेली ४० वर्षांपासून पाणीपुरवठा करणारी मुख्य पाण्याची टाकी आता पूर्णपणे जीर्ण झाली आहे. टाकीच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असून त्यातून सतत पाणीगळती होत आहे. ही टाकी कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाल्याने, संपूर्ण नरला गावावर पाणीटंचाईचे सावट पसरले आहे. १२० लोकसंक्या असलेल्या नरला गावातील स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकीवर चढण्यासाठी असलेला लोखंडी जिना पूर्णपणे गंजला असून सिमेंट-काँक्रीटमधून विलग झाला आहे. जिना अत्यंत धोकादायक झाल्यामुळे ग्रामपंचायतीचे कर्मचारी टाकीवर चढण्याचे टाळतात. परिणामी, पाण्यात टाकावयाची ब्लीचिंग पावडर वेळेवर टाकली जात नाही. एवढेच नव्हे तर, सुरक्षेअभावी टाकीमध्ये पशुपक्षी घाण करत असल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे. अस्वच्छ व दूषित पाणीपुरवठ्यामुळे गावात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. गावातील ५०० हून अधिक कुटुंबांचा दैनंदिन पाणीपुरवठा याच एका टाकीवर अवलंबून आहे. मात्र, टाकीच्या दुरवस्थेमुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी प्रचंड वणवण करावी लागत आहे. रोज केवळ अर्धा तास पाणी येते. तेसुद्धा पूर्ण दाबाने येत नसल्याने हंडाभर पाणी भरणे मुश्कील होते. त्यामुळे आम्हाला नाईलाजाने इकडून-तिकडून किंवा दूरवरील विहिरींवरून पाणी आणावे लागत असल्याचे गावातील महिलांनी सांगितले असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. फुलंब्री तालुक्यातील नरला गावातील पाण्याच्या टाकीची दुरवस्था झाली असून पायऱ्यांचा स्लॅब कोसळला असल्याने अपघाताचा धोका आहे. निवेदने दिली तरीही दखल घेतलेली नाही ग्रामपंचायतीला वारंवार तोंडी व निवेदनाद्वारे सांगूनही अद्याप दुरुस्ती किंवा नवीन टाकीचे काम झालेले नाही. टाकी अत्यंत धोकादायक स्थितीत असून ती कधीही कोसळू शकते. प्रशासनाने वेळेच लक्ष दिले नाही, तर मोठा अपघात घडण्याची भीती असल्याचे स्थानिक नागरिक प्रकाश तुपे यांनी सांगितले. तर एकीकडे नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहेत, तर दुसरीकडे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांच्यातील ढिसाळ कारभारामुळे नरला येथील जनता धोक्याच्या छायेत जगणे पसंत करत आहे. अपघात घडण्यापूर्वी जिल्हा परिषद आणि पाणीपुरवठा विभागाने त्वरित दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. नवीन टाकीचा प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर ः ग्रामसेवक सदर टाकीच्या दुरुस्ती व नव्या बांधकामाचा प्रस्ताव आम्ही जिल्हा परिषदेकडे पाठवलेला आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन कुठलीही पाहणी किंवा कारवाई केलेली नाही. आम्ही आमच्या स्तरावरून पाठपुरावा करत आहोत. याबाबत पंचायत समिती, जिल्हा परिषद प्रशासनाला कळविण्यात आले असल्याचे ग्रामसेवक अमोल पंडित यांनी सांगितले. दरम्यान, टाकीवर चढण्यासाठी असलेला लोखंडी जिना पूर्णपणे गंजला असून सिमेंट-काँक्रीटमधून विलग झाला आहे. जिना अत्यंत धोकादायक झाल्यामुळे ग्रामपंचायतीचे कर्मचारी टाकीवर चढण्याचे टाळत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
Source link
गावकरी चिंतेत:नरला गावामधील 40 वर्षांपूर्वीची पाण्याची टाकी आली मोडकळीस, जिल्हा प्रशासनाने दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांमधून मागणी