Headlines

एमआयएमचे समीर बिल्डर म्हणाले, गौरीपूजनासाठी सभा तहकूब करा:भाजप-शिवसेनेचाही पाठिंबा; मात्र इतर विषय प्रलंबित




मनपाच्या शुक्रवारी (१८ सप्टेंबर) महापौर समीर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत एक वेगळेच राजकीय चित्र पाहायला मिळाले. विरोधी पक्षनेते तथा एमआयएमचे नेते समीर बिल्डर यांनी गौरी-गणपती सणाचे कारण देत सभा तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडला. सणामुळे महिला सदस्यांना उपस्थित राहणे अडचणीचे ठरेल, असा युक्तिवाद त्यांनी केला. विशेष म्हणजे, भाजपचे राजू वैद्य, सभागृहनेते गोविंद केंद्रे आणि शिवसेनेचे किशोर नागरे यांनी एमआयएमला ‘हिंदू सणांबद्दल जिव्हाळा’ असल्याचे सांगत या प्रस्तावाला थेट समर्थन दिले. यानंतर महिला सदस्यांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्वांच्या सहमतीने सभा तहकूब करत असल्याचे महापौर राजूरकर यांनी जाहीर केले. साडेपाच वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर मनपात सत्ताधारी भाजप-शिवसेना आणि विरोधी पक्ष एमआयएम यांच्यात नेहमीच संघर्ष दिसतो. मागील ६ महिन्यांतील ४ पैकी ३ सभांमध्ये अतिक्रमण आणि पाणीप्रश्नावरून मोठा गदारोळ झाला होता. मात्र, शुक्रवारच्या या तहकुबीमुळे जुन्या शहरातील पाणीप्रश्न, खराब रस्ते आणि अतिक्रमण कारवाईस विरोध करणाऱ्या नेत्यांवरील कारवाईचे अत्यंत महत्त्वाचे प्रस्ताव प्रलंबित राहिले. आता २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पुढील सभेत प्रशासनाने हेच प्रलंबित विषय नव्याने विषयपत्रिकेवर घेण्याची तयारी केली आहे. ॲनालिसिस: बदललेली स्क्रिप्ट आणि एमआयएमची ‘गुगली’ एरवी अतिक्रमण किंवा जुन्या शहराच्या प्रश्नांवरून एकमेकांना भिडणारे दोन्ही गट एका क्षणात कसे एकत्र आले याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. विशिष्ट समुदायासाठी आक्रमक असणाऱ्या एमआयएमला अचानक हिंदू सणांबाबत उत्सुकता दाटून आली आणि कट्टर हिंदुत्ववादी भाजपने त्यांच्या या गुगलीला समर्थन देत त्यांचे कौतुकही केले. एमआयएमने हिंदू सणांचा मुद्दा उपस्थित करून भाजपची राजकीय कोंडी केली. भाजपने यास नकार दिला असता तर लोकांमध्ये चुकीचा संदेश गेला असता एवढे मात्र खरे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *