Headlines

छत्रपती संभाजीनगरात अपघातांचे सत्र:नमाज पठण करून परतणाऱ्या तरुणाचा मृत्यू, बहिणीला सोडण्यासाठी गेलेला भाऊ गंभीर; बहीण जखमी




नमाज पठण करून घरी परतण्यासाठी अनोळखी दुचाकीस्वाराकडे मागितलेली लिफ्ट एका तरुणाच्या जिवावर बेतली. भरधाव सिमेंट मिक्सरने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाचा चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. ही घटना एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत, ईएसआयसी हॉस्पिटलसमोर शुक्रवारी (१८ सप्टेंबर) सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. शेख तौसिफ अहमद शेख निहाल अहमद (३४, रा. शरीफ कॉलनी, कटकट गेट) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तौसिफच्या नातेवाइकांनी सांगितले की, तो प्रत्येक शुक्रवारी दर्गावाली मशिदीत नमाज पठणासाठी जात असे. शुक्रवारीही तो नमाज अदा करण्यासाठी गेला होता. नमाज पठण करून सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घरी परतत असताना त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीला लिफ्ट मागितली. दुचाकी चालकाने गाडी थांबवून तौसिफला मागे बसवले. त्याच वेळेस त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या सिमेंट मिक्सरने (एमएच ०४ – जीआर १२२९) धडक दिली. या धडकेत तौसिफ दुचाकीवरून खाली पडून थेट सिमेंट मिक्सरच्या मागच्या चाकाखाली सापडला. यात तो गंभीर जखमी झाला. अपघात होताच नागरिकांनी धाव घेत त्याला उपचारासाठी घाटीत दाखल केले. दोन मुलींच्या डोक्यावरील पितृछत्र हरपल्याने हळहळ तौसिफ हा मोबाइल दुकानात सेल्समन म्हणून काम करत होता. त्याचे वडील वेल्डिंगचे काम करतात. तौसिफच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुली असा परिवार आहे. एका दुर्दैवी अपघातात अचानक मृत्यू झाल्याने दोन चिमुकल्या मुलींच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. बहिणीला सासरी सोडण्यासाठीगेलेल्या भावाला कारची धडक; कारने दुचाकीला उडवले; भाऊ गंभीर, बहीण जखमी बहिणीला सासरी सोडण्यासाठी दुचाकीवरून जात असलेल्या भावाच्या दुचाकीला भरधाव कारने जोरदार धडक दिली. या अपघातात भाऊ गंभीर, तर बहीण किरकोळ जखमी झाली. हा अपघात १६ सप्टेंबर रोजी रात्री दहेगाव फाट्याजवळील ढोले यांच्या मळ्याजवळ घडला. गंभीर जखमी भावावर घाटी रुग्णालयातील ट्रॉमा केअर वार्डात उपचार सुरू आहेत. योगेश बाबू काळुखे (२४, रा. दहेगाव बंगला, ता. गंगापूर) यांनी याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, योगेश हे १६ सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास बहीण अंजली हिला सासरी सोलेगाव येथे सोडण्यासाठी दुचाकीवरून दहेगाव बसस्थानकाकडे जात होते. दहेगाव फाट्याजवळ ढोले यांच्या मळ्याच्या परिसरात समोरून भरधाव आलेल्या कारने (एमएच-२०-ईपी-२४५७) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत योगेश यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या पोटरी व मांडीचे हाड फ्रॅक्चर झाले. अंजली यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली. दोघांनाही उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर अंजली यांना घरी सोडण्यात आले, तर योगेश यांच्यावर ट्रॉमा केअर वार्डात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कारचालकाविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार खोसरे करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *