Headlines

कोल्ही प्रकल्प कोरडा; 3.98 टक्के पाणीसाठा, परिसरात टंचाईचे सावट:नागरिकांची पाण्यासाठी भटकंती, काही गावांना 8 दिवसांआड होतोय पाणीपुरवठा‎




पावसाचे सुरुवातीचे तब्बल तीन महिने उलटून गेले तरी वैजापूर तालुक्यातील कोल्ही मध्यम प्रकल्पात पाण्याचा थेंबही न आल्याने सध्या केवळ ३.९८ टक्के इतकाच तुटपुंजा पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ऐन पावसाळ्यातच धरण कोरडे पडल्याने खंडाळा व परिसरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. खंडाळा, कोल्ही, शिऊर आणि अलापूरवाडी या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य आधार असलेल्या कोल्ही मध्यम प्रकल्पात दरवर्षी पावसाळ्यात ८० ते ९० टक्के पाणीसाठा उपलब्ध असतो. मात्र, यंदा जून, जुलै आणि ऑगस्ट या तिन्ही महिन्यांत समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणात अपेक्षित आवक झालीच नाही. परिणामी, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच प्रकल्पाने पार तळ गाठला आहे. या परिस्थितीचा थेट फटका स्थानिक ग्रामस्थांना बसत आहे. पावसाळ्यातही गावात ८ ते १० दिवसांआड नळाद्वारे पाणीपुरवठा होत असून ते पाणी पिण्यायोग्य नाही. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी जार आणि खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. आर्थिक अडचणींमुळे पाणी विकत घेणे शक्य नसलेल्या कुटुंबांतील महिला आणि लहान मुलांना पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे. पावसाच्या अभावामुळे शेतातील सोयाबीन, मका आणि कापूस ही पिके कोमेजून गेली आहेत. विहिरींनीही तळ गाठल्याने परिसरातील शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडले आहेत. ऐन पावसाळ्यात ही बिकट परिस्थिती असेल, तर येत्या उन्हाळ्यात काय होणार, असा चिंताजनक प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत असून प्रशासनाने तातडीने टँकर सुरू करावेत, अशी मागणी होत आहे. मागील वर्षी याच काळात १०० टक्के भरलेल्या बिलवणी, जरूळ आणि खंडाळा या मध्यम प्रकल्पांमध्ये यंदा ० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मण्याड साठवण तलावात मागील वर्षी १०० टक्के पाणी होते, तेथे यंदा अवघा २.३३ टक्के साठा शिल्लक आहे. याशिवाय बोर दरेगाव प्रकल्पात ४.८८ टक्के, नारंगी प्रकल्पात १६.७३ टक्के (मागील वर्षी ३५.६०%), सटाणा प्रकल्पात ४९.५३ टक्के (मागील वर्षी ७१.२४%) आणि गाढे पिंपळगाव प्रकल्पात ८५.३९ टक्के (मागील वर्षी १००%) पाणीसाठा राहिला आहे. अवैध पाणी उपशावर होणार कडक कारवाई कर्मचाऱ्यांमार्फत परिसरातील सर्व शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. १५ सप्टेंबर रोजी कोल्ही प्रकल्पात अवैध पाणी उपसा करणारे १४ स्टार्टर जप्त करण्यात आले. यापुढेही अनधिकृत विद्युत मोटारी आढळल्यास जप्त करून कायदेशीर कारवाई केली जाईल. सध्याचा पाणीसाठा लक्षात घेता, पुढील काळात पाऊस न झाल्यास हे पाणी ऑक्टोबरअखेरपर्यंत केवळ पिण्यासाठीच पुरेल, असे नांदूर मधमेश्वर मध्यम प्रकल्प विभाग वैजापूरचे सहायक अभियंत पवन चव्हाण यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *