Headlines

गूढ उकलले:घरी अनोळखी नंबरवरून केलेल्या काॅलमुळे गांधेलीतील खुनाचा छडा, गांधेलीत 15 जुलै रोजी रस्त्यालगत सापडला होता मृतदेह




बीड बायपास परिसरातील गांधेली शिवारात झुडपात आढळलेल्या कुजलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. झाल्टा फाट्यावर योगायोगाने भेटलेल्या रिक्षाचालकासोबत दारू पिताना शिवीगाळ केल्याने या तरुणाचा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी कोणताही थेट पुरावा नसताना मृताने कुटुंबीयांना एका अनोळखी क्रमांकावरून केलेल्या शेवटच्या कॉलवरून धागेदोरे जुळवत १२ दिवसांच्या तपासानंतर गुन्हे शाखेने आरोपी रिक्षाचालकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. शेख अनीस शेख अनिब (२६, रा. जुलेखानगर, देवळाई, मूळ रा. राजाराय टाकळी, ता. खुलताबाद) असे आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे, तर गोरख अर्जुन राऊत (३५, रा. गेवराई, जि. बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे. १५ जुलै रोजी गांधेली फाट्यासमोर गोरखचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. शवविच्छेदन अहवालात डोक्याला गंभीर मार लागल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला. मात्र, आरोपीचा कोणताही सुगावा नव्हता. तपासादरम्यान गोरखच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली की, गोरखने कुटुंबीयांना शेवटचा कॉल एका अनोळखी नंबरवरून केला होता. पोलिसांनी तातडीने त्या मोबाइलधारकाचा शोध घेऊन त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याने सांगितले की, “हा तरुण मला झाल्टा फाटा येथे भेटला होता. घरी एक कॉल करू द्या, असे म्हणून त्याने माझा मोबाइल मागितला होता.’ याच माहितीवरून गुन्हे शाखेला तपासाची मुख्य दिशा मिळाली. सीसीटीव्ही चित्रीकरणाची
१२ दिवस केली तपासणी झाल्टा फाट्याचे ‘लोकेशन’ मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या पथकाने देवळाई चौक ते झाल्टा आणि केंब्रिज चौक या परिसरातील प्रत्येक हॉटेल आणि दुकानांचे २५ पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले. सलग १२ दिवस या फुटेजची अतिशय बारकाईने पाहणी केली असता एका फुटेजमध्ये गोरख आरोपीच्या रिक्षात बसताना पोलिसांना आढळून आला. त्यावरून पोलिसांनी रिक्षाचालक शेख अनीसचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. रागाच्या भरात डोक्यात घातला दगड पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी अनीसने गुन्ह्याची कबुली दिली. १२ जुलै रोजी संध्याकाळी अनीसने गोरखला झाल्टा फाट्यावरून आपल्या रिक्षात बसवले. तासभर फिरल्यानंतर दोघांनी झाल्टा फाट्यावरील एका दुकानातून देशी दारू घेतली आणि गांधेली फाट्यासमोरील झुडपात जाऊन दारू प्यायली. मृत आणि आरोपी हे एकमेकांच्या पूर्वीच्या ओळखीचे नव्हते. दारूच्या नशेत गोरखने अनीसला थेट आईवरून शिवीगाळ केली. यावरून त्यांच्यात मोठा वाद झाला. रागाच्या भरात अनीसने गोरखला बेदम मारहाण केली आणि डोक्यात मोठा दगड घातला. या मारहाणीत गोरखचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अनीस मृतदेह तेथेच टाकून रिक्षा घेऊन पसार झाला होता. ही कारवाई निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक निरीक्षक प्रशांत गंभीरराव, अंमलदार संदीप तायडे, कैलास काकड यांच्या पथकाने केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *