Headlines

राजभवनासमोर काँग्रेसचे काळे झेंडे दाखवून आंदोलन:विद्यार्थ्यांवरील कथित पोलीस कारवाईविरोधात निषेध व्यक्त




पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने बुधवारी पुण्यातील राजभवनाच्या प्रवेशद्वारासमोर काळे झेंडे दाखवून आंदोलन केले. दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलीस कारवाईच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्ष अखेरपर्यंत लढेल, असा निर्धार यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसने आरोप केला की, दिल्लीतील विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना केंद्र सरकारने त्यांच्यावर पोलीस बळाचा वापर केला. या कारवाईच्या निषेधार्थ लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार प्रियांका गांधी यांनीही दिल्लीत आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार, पेपरफुटी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान यासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, “देशभरातील विद्यार्थी न्यायासाठी आंदोलन करत असताना केंद्र सरकार शिक्षणमंत्र्यांना अभय देत आहे. नीटसारख्या परीक्षेसाठी विद्यार्थी कठोर परिश्रम घेतात, मात्र पेपरफुटीमुळे त्यांच्या भविष्याशी खेळ झाला आहे. शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीमार करणे निषेधार्ह आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे.” पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांनी केंद्र सरकार पेपरफुटी रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, “विद्यार्थी अनेक तास अभ्यास करून परीक्षेची तयारी करतात. पेपरफुटीमागील साखळीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.” या आंदोलनात नीता रजपूत, अविनाश साळवे, रफिक शेख, अविनाश बागवे, मेहबूब नदाफ, मोहसीन शेख, लता राजगुरू, भाऊसाहेब आजबे, प्रियंका रनपिसे, विठ्ठल गायकवाड आणि हर्षल हांडे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *