![]()
प्रसिद्ध लावणी कलावंत सुरेखा पुणेकर यांनी लावणी कलाकारांना शासनाकडून अनुदान आणि आवश्यक सुविधा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. लावणी ही महाराष्ट्राची शान आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरा असून, ही लोककला जिवंत ठेवण्यासाठी आयुष्यभर योगदान देणाऱ्या कलाकारांना पाठिंबा मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुरेखा पुणेकर यांनी सांगितले की, त्या गेल्या ४० वर्षांपासून लावणी क्षेत्रात कार्यरत आहेत. महाराष्ट्राच्या मातीतील ही कला देश-विदेशातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. जगभरातील रसिकांनी लावणीला भरभरून प्रतिसाद दिला, मात्र आज अनेक लावणी कलाकार आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. उत्पन्नाची शाश्वती नसल्यामुळे त्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. लावणी कलाकारांना पुरेसे अनुदान मिळत नाही समाजातील विविध क्षेत्रांना शासनाकडून अनुदान दिले जाते, परंतु महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख जपणाऱ्या लावणी कलाकारांना पुरेसे अनुदान मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कलाकारांच्या वृद्धापकाळातील उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर असून, त्यांच्यासाठी मानधन, विमा, आरोग्य सुविधा आणि निवृत्तिवेतनासारख्या योजना सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. पांढरपेशा वर्ग लावणीपासून दूर गेला बदलत्या काळात पांढरपेशा वर्ग लावणीपासून दूर गेल्याचे निरीक्षणही पुणेकर यांनी नोंदवले. लावणीच्या काही कार्यक्रमांमध्ये आलेली अश्लीलता दूर करून या कलेचे मूळ, दर्जेदार आणि पारंपरिक स्वरूप जपले पाहिजे. सभ्य व कौटुंबिक प्रेक्षक पुन्हा लावणीकडे आकर्षित होतील, अशा पद्धतीने कार्यक्रमांची निर्मिती होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. कलाकार जगला तरच महाराष्ट्राची लावणी टिकेल “निर्माता जगला तर कलाकार जगेल आणि कलाकार जगला तरच महाराष्ट्राची शान असलेली लावणी टिकेल,” असे सांगत त्यांनी निर्मात्यांच्या आर्थिक सुरक्षिततेवरही भर दिला. लावणी कलाकार आणि निर्मात्यांचे प्रश्न संघटितपणे मांडण्यासाठी पुण्यातील निर्मात्यांनी एकत्र येत ‘लोककला लावणी निर्माता कलाकार संघ’ स्थापन केला आहे. या संघाच्या माध्यमातून कलाकारांच्या न्याय्य हक्कांसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे पुणेकर यांनी स्पष्ट केले.
Source link
लावणी कलाकारांना शासनाने अनुदान द्यावे:सुरेखा पुणेकर यांची मागणी, म्हणाल्या- कलाकार टिकला तर महाराष्ट्राची शान टिकेल