- Marathi News
- National
- Brahmapuri In The State Recorded The Highest Temperature Of 46.7 Degrees In The Country, 50 Indian Cities Including Chandrapur Are Among The Hottest Cities In The World
नवी दिल्ली43 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

भीषण उष्णतेचा सामना करणाऱ्या भारतात शुक्रवारी सकाळी एक असामान्य विक्रम नोंदवला गेला. जगातील ५० सर्वात उष्ण शहरांच्या यादीत सर्व शहरे भारतातीलच होती. एअर क्वालिटी आणि वेदर ट्रॅकर ‘एक्यूआय.इन’नुसार, सकाळी १०:५० वाजता ओडिशातील बलांगीर ४५ अंश सेल्सियस तापमानासह सर्वात उष्ण शहर ठरले. त्यापाठोपाठ चंद्रपूर आणि प्रयागराज येथे ४४ अंश तापमानाची नोंद झाली.
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, हरियाणा आणि तेलंगणातील अनेक शहरांमधील तापमान दुपारपूर्वीच ४२ ते ४४ अंशांवर पोहोचले होते. एकट्या उत्तर प्रदेशातील २२ शहरे या उष्ण शहरांच्या यादीत होती. देशातील सुमारे २२ मोठ्या शहरांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सियसच्या वर नोंदवले गेले, म्हणजेच या शहरांमध्ये तीव्र उष्णतेची लाट कायम राहिली. दुपारपर्यंत बांदामध्ये ४७.६ अंश तापमानाची नोंद झाली.

भारतीय हवामान विभागाने उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात पुढील काही दिवस तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. अनेक राज्यांत रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारताच्या मोठ्या भागात तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली आहे. ओडिशापासून विदर्भ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारपर्यंतच्या भागात एक मोठा ‘हीट डोम’ तयार झाला आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या मते, कोरडे उत्तर-पश्चिमी वारे, निरभ्र आकाश आणि मान्सूनपूर्व वादळी पावसास झालेला विलंब यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.
उष्ण रात्री… तापमानात ६ अंशांपर्यंत फरक
भारतावर आधारित एका हवामान बदल अहवालानुसार, १९८६ ते २०१५ दरम्यान वर्षातील सर्वात उष्ण दिवसाच्या तापमानात ०.६३ अंशांची वाढ झाली, तर सर्वात थंड रात्रीच्या तापमानात ०.४० अंशांची वाढ झाली. असा अंदाज आहे की, शतकाच्या अखेरीस सर्वात उष्ण दिवसाचे तापमान ४.७ अंशांनी, तर सर्वात थंड रात्रीचे तापमान ५.५ अंशांपर्यंत वाढू शकते. शहरांमध्ये ‘अर्बन हीट आयलंड इफेक्ट’ मुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली. काँक्रीट, रस्ते, विटा व धातू दिवसा उष्णता शोषून घेतात आणि रात्री ती बाहेर टाकतात. एअर कंडिशनर्सची उष्ण हवाही एक मोठे कारण ठरतेय. शहरी भाग आणि बाहेरील भागात रात्री ४ ते ६ अंशांपर्यंतचा फरक असतो.
विदर्भात काही ठिकाणी रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा ५ अंशांपर्यंत जास्त नोंदवले गेले.
हवामान विभागाने इशारा दिला आहे की, पुढील ६-७ दिवस उत्तर-पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे.
ऑरेंज अलर्ट: उष्णतेची लाट, सावध राहा पंजाब हरियाणा पश्चिम उत्तर प्रदेश पश्चिम मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिशा तेलंगणा
रेड अलर्ट: घरातून बाहेर पडणे टाळा पूर्व उत्तर प्रदेश पूर्व मध्य प्रदेश विदर्भ किनारपट्टीचा आंध्र प्रदेश
राज्यातील शहरांचे तापमान ब्रह्मपुरी ४७.२ वर्धा ४७.० चंद्रपूर ४६.४ अमरावती ४६.४ नागपूर ४५.७ यवतमाळ ४५.४ गोंदिया ४४.९ अकोला ४४.८ वाशिम ४२.६ जळगाव ४१.९ संभाजीनगर ४१.४ परभणी ४१.३ मालेगाव ४१.२ जालना ४१.० बुलढाणा ४१.० बीड ४०.५ अहिल्यानगर ३९.८ धाराशिव ३८.६ पुणे ३७.० सोलापूर ३६.८ नाशिक ३६.३ सातारा ३५.७ मुंबई ३५.० महाबळेश्वर २७.३