Headlines

रामाला माफियांनी घेरले आहे का?:संजय राऊतांचा सवाल, देशातील सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करत भाजपवर टीका




शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देशातील सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करत भाजपवर जोरदार टीका केली. ‘रामाला दहशतवाद्यांनी नाही, तर माफियांनी घेरले आहे का?’ असा प्रश्न निर्माण झाल्याचे ते म्हणाले. कै. धनंजय थोरात मेमोरियल फाउंडेशनच्या आदर्श कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. संजय राऊत म्हणाले की, पारधी समाजाचे जगणे आजही कठीण आहे, जसे ब्रिटिशांनी त्यांना गुन्हेगार ठरवले होते. आज देशात कोण गुन्हेगार किंवा चोर आहे, हे पंतप्रधान ठरवतात अशी स्थिती आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी काम करणे हा गुन्हा ठरवला जात आहे. देशात सर्व धर्म आणि जाती एकत्र राहू नयेत, असे वातावरण निर्माण झाले आहे. संजय राऊत यांनी यावेळी अनेक घोटाळ्यांचा उल्लेख करत राजकीय लागेबांधे असलेल्या आरोपींना शिक्षा होत नसल्याचे म्हटले. पश्चिम बंगाल निवडणुकीत चार हजार ईव्हीएम मशीन जाळल्या गेल्या आणि सरकारी इमारतींना आगी कशा लागतात, याचा विचार व्हायला हवा, असेही ते म्हणाले. अयोध्येतील दानपेटीतून पाच कोटी रुपये चोरी झाले, त्यावेळी सीसीटीव्ही बंद ठेवले गेले. ‘जय श्रीराम’ म्हणणाऱ्या भाजपने या पाच कोटी रुपयांचे काय झाले, याचे उत्तर द्यावे, अशी मागणी राऊत यांनी केली. कै. धनंजय थोरात मेमोरियल फाउंडेशनच्या आदर्श कार्यकर्ता पुरस्काराचे वितरण शनिवारी खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राज्य गुप्तचर खात्याचे निवृत्त अप्पर महासंचालक अशोक धिवरे, माजी आमदार उल्हास पवार, रामदास फुटाणे, आयोजक मोहन जोशी, ज्येष्ठ पत्रकार पराग करंदीकर, वसंत मोरे, युवराज शाह, अथर्व थोरात आणि रेखा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. पारधी समाजाच्या उन्नतीसाठी कार्यरत असणारे नामदेव भोसले, सुप्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णी आणि मुश्ताक पटेल यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. संजय राऊत यांनी धनंजय थोरात यांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, थोरात यांच्या निधनानंतरही असे कार्यक्रम अनेक वर्षे पार पडणे हे समाजातील कृतज्ञतेचे प्रतीक आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता त्यांनी काम केले. आज अनेकजण पदे मिळाल्यानंतरही दुसऱ्या पक्षात जात आहेत. कार्यकर्ता जमात नष्ट करून त्याला मालाचा भाव दिला जात आहे, निवडून आलेल्या लोकांना हमीभाव ठरलेला आहे. विचारांची बांधिलकी आज राहिलेली नाही, अन्यथा जीवनाला अर्थ नाही. जोपासलेला विचार आणि निष्ठा सोडून दुसऱ्या पक्षात जाणे हा जागतिक प्रश्न बनला आहे. निष्ठा आणि विचारांच्या व्याख्या बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे देशाला सध्या ‘चिमट्यांची’ नव्हे, तर ‘हल्ल्यांची’ गरज आहे. मी कधी सरकारविरोधात चिमटे काढत नाही, तर हल्ले करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. समाजातील तळागाळातील लोकांनी जे आयुष्य जगले आहे आणि जगत आहेत, ते पाहून अस्वस्थता वाटते. माणूस म्हणून आपण माणसांना नाकारत आहोत, ही भावना अस्वस्थ करणारी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *