Headlines

रायगडच्या जागेसाठी महायुतीत मोठी डील?:अनिकेत तटकरे यांच्यासाठी शिवसेनेची माघार, मात्र बदल्यात पालकमंत्रीपदाची मागणी




राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून मोठ्या राजकीय घडामोडी समोर येत आहेत. या जागेवरून महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी राजकीय डील झाल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा करण्यासाठी शिवसेनेने आपला दावा मागे घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्याबदल्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाची मागणी शिवसेनेकडून करण्यात आल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडण्यास शिवसेना तयार झाली आहे. या जागेवरून अनिकेत तटकरे यांना विधानपरिषदेत पाठवण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या बदल्यात रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेच्या वाट्याला यावे, अशी अट घालण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे गेल्या सव्वा वर्षांपासून रिक्त असलेल्या रायगडच्या पालकमंत्रीपदावर आता शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांची वर्णी लागू शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे. रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. रायगडसाठी शिवसेनेकडून भरत गोगावले यांचे नाव पुढे केले जात होते, तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांच्यासाठी आग्रह धरण्यात येत होता. मात्र विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. महायुतीतील जागावाटप आणि राजकीय समतोल साधण्यासाठी हा फॉर्म्युला पुढे आल्याची चर्चा आहे. महायुतीच्या प्राथमिक फॉर्म्युल्यानुसार विधानपरिषद निवडणुकीत भाजपला 12, शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा देण्याचा विचार होता. मात्र शिवसेनेकडून 7 जागांची मागणी करण्यात आली होती. त्याचबरोबर काही मतदारसंघांवर शिवसेनेकडून दावा करण्यात आला होता, जे भाजप आणि राष्ट्रवादीच्या वाट्याचे मानले जात होते. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरही शिवसेनेकडून जोरदार दावा करण्यात आला होता. त्यामुळे जागावाटपावरून महायुतीत तणाव वाढल्याचे चित्र निर्माण झाले होते. यावर तोडगा काढण्यासाठी भाजपचे नेते आणि एकनाथ शिंदे यांच्यात अनेक फेऱ्यांच्या चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची मंगळवारी देवगिरी बंगल्यावर झालेली बैठकही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरली. या बैठकीत पक्षातील अंतर्गत नाराजी उघड झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रफुल पटेल बैठकीला अनुपस्थित राहिले, तर सुनील तटकरे यांनी बैठकीत आपल्या मनातील नाराजी उघडपणे व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्ष एकसंध ठेवण्यासाठी आपण आणि प्रफुल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, मात्र त्यानंतर टीकेच्या काळात पक्षातील कोणीही आमच्या पाठीशी उभे राहिले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केल्याची चर्चा आहे. तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक चकमक तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यानही आपल्यालाच लक्ष्य करण्यात आले, असेही सुनील तटकरे यांनी बैठकीत स्पष्ट केल्याचे समजते. या बैठकीत त्यांची आणि छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सर्व घडामोडींमुळे महायुतीतील जागावाटप, पालकमंत्रीपदाची चर्चा आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत नाराजी या मुद्द्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *