Headlines

रेल्वेच्या कारवाईपूर्वी नागरिकांचे पुनर्वसन करा:आ. साजिद खान पठाण यांची मागणी




शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील तारफैल परिसरात गेल्या तीन पिढ्यांपासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे. रेल्वे विभागाकडून संबंधित जागा ताब्यात घेण्याच्या हालचालींना वेग आल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात बैठक घेत प्रशासनाकडे प्रभावित कुटुंबीयांच्या पुनर्वसनाची मागणी केली. तारफैल परिसरातील काही भाग रेल्वे विभागाच्या अखत्यारीत येत असून त्या ठिकाणी अनेक कुटुंबे दशकांपासून राहत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागामार्फत जागेची मोजणीही करण्यात आली आहे.दरम्यान मंगळवारी भूमी अभिलेख कार्यालयात बैठक झाली. आ. पठाण यांनी मोजणी शिट, सीमांकन व अन्य तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेतला. जागा ताब्यात घेण्यापूर्वी शासनाने प्रभावित कुटुंबियांचे पुनर्वसन करणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना अचानक बेघर करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. जर तातडीने तोडगा निघत नसेल, तर कुटुंबियांना पर्यायी व्यवस्था करण्यासाठी काही कालावधी देण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली. यापूर्वीही या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली होती. तसेच पालकमंत्री आकाश फुंडकर आणि जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्याशी चर्चा करून पुनर्वसनाचा मुद्दा मांडण्यात आला होता. यावेळी कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिल्याची माहिती आ. पठाण यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *