![]()
तब्बल ३२ वर्षांपासून रखडलेली रोटेगाव औद्योगिक वसाहत आता प्रत्यक्षात साकारण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. रोटेगाव, जरुळ, आघुर आणि लोणी या चार गावांतील सुमारे ११७० एकर जमिनीवर उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी एमआयडीसीने नवीन फलक उभारले असून, भूखंडांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेलाही सुरुवात केली आहे. विधान परिषदेच्या आचारसंहितेमुळे पुढील प्रक्रिया तात्पुरती थांबली असली तरी ती संपताच रस्ते, प्लॉटिंग आणि भूखंडांच्या खुणा करण्याची कामे युद्धपातळीवर सुरू होणार आहेत. ११७० एकर जमीन औद्योगिक विकासासाठी संपादित करण्यात आली आहे. गेली तीन दशके रखडलेल्या या प्रकल्पाला आता गती मिळाली असून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आठ दिवसांपूर्वी वैजापूर दौऱ्यातही, एका महिन्यात कामांना युद्धपातळीवर सुरुवात होईल, असे स्पष्ट केले. दरम्यान या प्रश्नासाठी आमदार रमेश बोरनारे, नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी आणि माजी उद्योग संचालक जे. के. जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला. देशातील आघाडीची महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी या औद्योगिक वसाहतीत गुंतवणुकीसाठी अनुकूल असल्याची चर्चा असून, कंपनीच्या प्रतिनिधींनी जागेची पाहणी केली आहे. रस्ते, प्लॉटिंग आणि भूखंडांच्या खुणा करण्याची कामे बाकी आहेत. काही शेतकऱ्यांचे न्यायालयीन प्रश्न सुरू असले तरी एमआयडीसीचे काम आता थांबणार नाही. सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे माजी उद्योग संचालक जे.के. जाधव यांनी सांगितले. औद्योगिक वसाहतीला लागूनच रोटेगाव रेल्वे स्थानक असल्याने मालाच्या वाहतुकीसाठी सुविधा उपलब्ध होणार आहे. समृद्धी महामार्ग आणि एनएच-७५२ महामार्ग उद्योगांना प्रमुख बाजारपेठांशी जोडणारा आहे. औद्योगिक वसाहतीसाठी पाण्याची उपलब्धता हा मोठा प्रश्न होता. मात्र नारंगी मध्यम प्रकल्प, गोदावरी आणि जलजीवन मिशनच्या पाईपलाईनमुळे हा प्रश्न मिटणार आहे . उद्योगांना पाणीपुरवठा झाल्यास नवीन गुंतवणूक वाढणार आहे. Ãटेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे. आचारसंहितेमुळे वर्क ऑर्डरची प्रक्रिया थांबली असली तरी निवडणुकीनंतर कामांना गती मिळेल. – अमित भामरे, रिजनल ऑफिसर, एमआयडीसी
Source link
रोटेगाव एमआयडीसीत भूखंडासाठी नोंदणी सुरू:आचारसंहितेनंतर रस्ते, प्लॉटिंग आणि उद्योग उभारणीच्या कामांना येणार वेग