![]()
मुंबईतील गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेला लालबागचा राजा अनेक तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर शनिवारी सकाळी गिरगाव चौपाटीच्या परिसरात पोहोचला. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मंडपातून निघालेला बाप्पा लालबाग, भायखळा आणि गिरगाव असा प्रवास करत सकाळी साडेसहाच्या सुमारास चौपाटीजवळ दाखल झाला. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी लालबागचा राजा चौपाटीच्या परिसरात पोहोचल्याची माहिती मिळताच पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली. बाप्पाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गिरगाव चौपाटी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. विसर्जनापूर्वी लालबागच्या राजाची आरती करण्यात येणार असून त्यानंतर बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. तराफ्यापर्यंत नेण्यासाठी मानवी साखळी लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यापर्यंत सुरक्षितपणे नेता यावी यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मानवी साखळी तयार केली आहे. मात्र, समुद्राला सध्या ओहोटी असल्याने विसर्जनाच्या प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता आहे. समुद्राचे पाणी ओसरल्याने विसर्जन लांबणार मोठ्या मूर्तीला तराफ्यावर चढवण्यासाठी समुद्राचे पाणी आवश्यक पातळीपर्यंत असणे गरजेचे आहे. सध्या ओहोटीमुळे समुद्राचे पाणी आत गेले आहे. त्यामुळे लालबागच्या राजाला तराफ्यावर चढवण्यासाठी भरतीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मागील वर्षीही अशाच परिस्थितीमुळे विसर्जनाला विलंब झाला होता. दुपारी १२ ते १ वाजण्याची शक्यता मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास समुद्राला भरती येण्याची शक्यता आहे. त्यानंतर लालबागच्या राजाला तराफ्यावर चढवण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. त्यामुळे बाप्पाचे प्रत्यक्ष विसर्जन दुपारी १२ ते १ वाजण्याच्या दरम्यान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तोपर्यंत भाविकांना चौपाटीवर प्रतीक्षा करावी लागू शकते. इतर मोठ्या मूर्तींच्या विसर्जनालाही विलंब गिरगाव चौपाटीवर मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू आहे. मात्र, ओहोटीमुळे लालबागच्या राजाला थांबावे लागत असल्याने इतर मोठ्या मूर्तींच्या विसर्जनालाही काही प्रमाणात विलंब होण्याची शक्यता आहे. चिंचपोकळीचा चिंतामणीही चौपाटीजवळ मुंबईतील आणखी एक मानाचा गणपती असलेला चिंचपोकळीचा चिंतामणीही गिरगाव चौपाटीच्या परिसरात दाखल झाला आहे. शुक्रवारी दुपारी मंडपातून निघाल्यानंतर चिंतामणीची विसर्जन मिरवणूकही चौपाटीपर्यंत पोहोचली. पारंपरिक पद्धतीने चिंचपोकळीच्या चिंतामणीला तराफ्यावर नेऊन खोल समुद्रात विसर्जित केले जाणार आहे. पवईतही मोठ्या मूर्तींचे विसर्जन बाकी दरम्यान, शनिवारी सकाळ झाली असतानाही मुंबई उपनगरातील पवई तलावावर जवळपास ५० मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन बाकी असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबईतील प्रमुख विसर्जनस्थळांवर अजून काही तास भाविकांची गर्दी आणि विसर्जन सोहळा सुरू राहण्याची शक्यता आहे. गेले आहेत. हेही वाचा.. गणेश विसर्जनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरगाव चौपाटीवर: विरोधकांना सुबुद्धी येवो, बाप्पाकडे मागणे गेल्या दहा-बारा दिवसांपासून मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहाने पुजल्या गेलेल्या आपल्या लाडक्या विघ्नहर्त्या गणरायाला निरोप देण्याचा भावुक क्षण अखेर आला आहे. आज अनंत चतुर्दशीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांची धूम पाहायला मिळत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या एकाच जयघोषाने राज्यातील प्रमुख शहरे आणि गावे दुमदुमून गेली आहेत. सविस्तर वाचा
Source link
लालबागच्या राजाचे विसर्जन लांबणीवर!:गिरगाव चौपाटीवर समुद्राला ओहोटी, दुपारनंतरच देणार बाप्पाला निरोप