![]()
लासूर स्टेशन येथे सुरू असलेल्या नवीन बस स्थानकाच्या बांधकामामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लासुरशहर शाखेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र सरचिटणीस दिलीप पाटील बनकर यांच्या उपस्थितीत कार्यकारी अभियंता छत्रपती संभाजीनगर यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लासुरस्टेशन येथील बस स्थानकाच्या बांधकामामध्ये दर्जाहीन साहित्याचा वापर होत असून काही ठिकाणी उभारण्यात आलेल्या कॉलमला भेगा पडलेल्या दिसून येत आहेत. तसेच बांधकामाची गुणवत्ता समाधानकारक नसल्याने भविष्यात प्रवासी व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत संबंधित विभागाने तत्काळ बांधकामाची तांत्रिक तपासणी करून दोषी आढळणाऱ्या ठेकेदार व संबंधितांवर कारवाई करावी, तसेच दर्जेदार साहित्य वापरून काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र सरचिटणीस दिलीप पाटील बनकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य अमोल शिरसाठ, अल्पसंख्याक आघाडी तालुका अध्यक्ष अजीज भाई पठाण, राहुल गुंजकर, सचिन देहाडेंसह पदाधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक निधीतून उभारल्या जाणाऱ्या या महत्त्वाच्या प्रकल्पात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसून, नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्यांवर व नित्कृष्ट काम करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य तथा शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमोल शिरसाठ यांनी केली आहे.
Source link
लासूर स्टेशन बसस्थानकाच्या बांधकामाबाबत निवेदन