Headlines

वक्फ जमिनींच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर अनियमितता:बोर्डातील सदस्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, 96 हजार एकर जमिनीच्या चौकशीची मागणी




महाराष्ट्रात वक्फ बोर्डाच्या मालकीची सुमारे 96 हजार एकर जमीन आहे. मात्र, त्यापैकी पाच टक्के जमिनीचाही समाजाच्या हितासाठी वापर झालेला नाही. वक्फ मालमत्तांच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत आहे. या सर्व व्यवहारांची कागदपत्रांसह सखोल चौकशी करावी, अशी मागणी वक्फ टास्क फोर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम मुल्ला यांनी पत्रकार परिषदेत केली. वक्फ जमिनी आणि मालमत्तांना संरक्षण मिळावे, तसेच त्यांचा उपयोग समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी व्हावा, यासाठी राज्य सरकारने 2016 मध्ये वक्फ मंडळासंदर्भात अध्यादेश काढला होता. मात्र, प्रशासनाने या अध्यादेशाची अंमलबजावणी केली नाही. काही अधिकारी आणि संबंधितांनी स्वतःच्या फायद्यासाठी या अध्यादेशाकडे दुर्लक्ष केले, असा आरोप मुल्ला यांनी केला. वक्फ बोर्डाच्या काही सदस्यांकडूनही गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार केला जात असल्याचा दावा मुल्ला यांनी केला. पुण्यातील बाणेर परिसरातील वक्फ जमिनीच्या कथित गैरव्यवहाराचे प्रकरण त्यांनी उघडकीस आणले होते. या प्रकरणात वक्फ बोर्डाचे माजी सदस्य समीर काझी यांच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारल्यावर आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोपही मुल्ला यांनी केला. या आरोपांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. वक्फ जमिनींची बनावट किंवा खोटी कागदपत्रे तयार करून परस्पर विक्री करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोपही मुल्ला यांनी केला. प्रशासनाने वक्फ मालमत्तांचे मूळ अभिलेख, मालकी हक्क, आर्थिक नोंदी, प्रशासकीय आदेश आणि व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करावी. गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. वक्फ मालमत्ता कोणत्याही व्यक्तीच्या खासगी किंवा वैयक्तिक फायद्यासाठी नाहीत, त्या समाजाच्या कल्याणासाठी आहेत. या जमिनींवर शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, रुग्णालये आणि रोजगाराभिमुख उपक्रम उभारले जावेत. तसेच सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणून वक्फ जमिनींचे संरक्षण करावे, असे मुल्ला यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *