![]()
प्रेम, विरह, दुरावा व्यक्त करणाऱ्या कविता… सामाजिक आशय मांडणाऱ्या गझल… गायकीचे स्वर, सोबतीला बासरी, व्हायोलिन, सिंथसायझरची सुरेल साथ… असा शब्द-स्वरांचा उत्सव ‘दे मनाचा रिता कोपरा’ शनिवारी संध्याकाळी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या स्व. सो
.
प्रख्यात गझलकार, निवेदक नितीन भट, व्यवसायाने सर्जन, कवीमनाचे व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. उज्वल बारंगे यांच्या काव्यरचनांवर आधारित या कार्यक्रमाचा अमरावतीकरांनी मनसोक्त आस्वाद घेतला. विविध भावभावनांचे आविष्करण करणाऱ्या मुक्तछंद, गेय कविता, गझल सादर करून त्यांनी रसिकांच्या मनावर गारुड केले. काव्याचा आशय गडद करणारी वाद्यवृंदाची संगत, लखलखीत प्रकाशयोजना कार्यक्रमाच्या देखणेपणात भर घालणारी ठरली. नितीन भट यांनी तरन्नुममध्ये सादर केलेल्या ‘पुन्हा खोटे खरे झाले’, ‘कधी ओवाळणी केली’ आणि ‘तुटत असलो जरी आतल्या आत मी’ या गझल रसिकांच्या मनाला आनंद देऊन गेल्या. डॉ. उज्वल बारंगे यांनी गायलेल्या ‘हातातले तू हात’, ‘दिवा विझलेला होता’ आणि ‘दगड होऊन मन मोडले पाहिजे’ या गीतांनी कार्यक्रमाचे रंग अधिक गडद केले.
उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून जी. एच. रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, सायकोथेरपिस्ट डॉ. मोहना कुलकर्णी, पोलिस उपायुक्त यशवंत सोळंके, धामणगाव रेल्वेचे आमदार प्रतापदादा अडसड, तेथील नगराध्यक्ष अर्चना रोठे, वर्धा येथील राजकीय नेते राणा रणनवरे, ‘कृषकराज सोलर’चे संचालक राजेंद्र जवळकर, शिवमल्हार लॅबोरेटरीजचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. वैभव ढवळे, ‘कॉटन किंग’ प्रतिष्ठानचे संचालक अमोल चवणे उपस्थित होते.
आयोजनाची धुरा नेत्ररोगतज्ञ डॉ. सचिन बगडे, मनीष नांदूरकर, सारंग हरणे यांनी सांभाळली. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन तेजस्वीनी बगडे, डॉ. पायल रोकडे यांनी केले. तब्बल अडीच तास चाललेला हा सोहळा अमरावतीकर रसिकांच्या साक्षीने रंगला.‘दे मनाचा रिता कोपरा’ शनिवारी संध्याकाळी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या स्व. सोमेश्वर पुसतकर सभागृहात रंगला.
यांची साथ ठरली महत्त्वाची काव्यवाचनात सिंथसायझरवर रामेश्वर काळे, बासरीवर चेतन वानखडे, व्हायोलिनवर हरीश लांडगे यांनी पिलू, शुद्ध सारंग, मिया मल्हार, मिश्र पहाडी, चारुकेशी, भुपेश्वरी, गोरख कल्याण, झिंजोटी अशा रागांतील सुरावट समर्पकपणे पेरून मैफिल अधिक सुश्राव्य केली. आकर्षक प्रकाशयोजनेची जबाबदारी विराग जाखड, सौरभ शेंडे यांनी पार पाडली. ग्राफिक्सचे काम ऋषिकेश मोहोळे, हर्ष शर्मा, चमूने सांभाळले.