महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी सोशल मीडियावर केलेल्या एका छोट्याशा पोस्टने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये केवळ “कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तूर्तास एवढेच…”
.
विशेष म्हणजे, राज ठाकरे यांच्या या पोस्टची वेळही चर्चेचा विषय ठरली आहे. नुकतेच नवी मुंबईत हिंदी दिवस आणि 6वे अखिल राजभाषा संमेलन पार पडले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र हा देशातील सर्वाधिक बहुभाषिक राज्य असल्याचे वक्तव्य करण्यात आले. महाराष्ट्राच्या भूमीवर मराठीसोबतच कोकणी, गुजराती, सिंधी, हिंदी, कन्नड, वारली यांसह अनेक भाषांचा विकास झाला असल्याचे अमित शाह यांनी नमूद केले.
त्यामुळे राज ठाकरे यांच्या “कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते” या पोस्टचा संबंध हिंदीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या चर्चेशी आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र, राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतलेले नसल्याने त्यांचा नेमका रोख कोणाकडे आहे, हे स्पष्ट झालेले नाही.
राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं?
राज ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, “कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तूर्तास एवढेच…”
राज ठाकरे यांच्या राजकीय शैलीचा विचार केला तर ते अनेकदा एखाद्या मुद्द्यावर थेट भाष्य करण्याऐवजी सूचक किंवा उपरोधिक विधान करून राजकीय संदेश देतात. त्यामुळे या एका वाक्याच्या पोस्टमागे नेमका कोणता राजकीय संदर्भ आहे, याबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा, मराठी भाषा आणि हिंदीचा वाढता वापर या विषयांवर राज ठाकरे आणि मनसेने यापूर्वीही आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे सध्याच्या भाषाविषयक चर्चेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या पोस्टकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
अमित शहांनी महाराष्ट्राला ‘बहुभाषिक’ म्हटलं
नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रात हिंदी दिवस आणि 6वे अखिल राजभाषा संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. यावेळी अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक वैविध्याचा उल्लेख केला. “महाराष्ट्राच्या भूमीवर कोकणी, गुजराती, सिंधी, हिंदी, कन्नड, वारली अशा अनेक भाषांचा विकास झाला आहे आणि त्यांचा सन्मानही करण्यात आला आहे. महाराष्ट्रापेक्षा मोठे बहुभाषिक राज्य संपूर्ण भारतात दुसरे नाही,” असे त्यांनी म्हटले.
अमित शहांनी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचाही उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्याचवेळी महाराष्ट्रातील इतर भाषांचाही सन्मान केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. यामुळे महाराष्ट्राची ओळख केवळ एका भाषेपुरती मर्यादित न ठेवता त्याच्या बहुभाषिक स्वरूपावर भर देण्याचा अमित शाहांचा संदेश होता, असे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते.
फडणवीसांनीही मराठीसोबत इतर भाषांचा सन्मान करण्याचे आवाहन केले
या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाषाविषयक भूमिका मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजभाषा आणि मातृभाषेचा सन्मान करण्यावर सातत्याने भर दिल्याचे त्यांनी सांगितले. देशाची राजभाषा ही भारतीय भाषा असावी, तसेच प्रत्येकाने मातृभाषेबरोबर किमान आणखी एक भारतीय भाषा शिकावी, असा विचार ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेतून पुढे आणण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले. हिंदीने स्वातंत्र्यलढ्यात देशभर संपर्काचे माध्यम म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचेही त्यांनी नमूद केले. भाषांमधील संबंध स्पष्ट करताना फडणवीस यांनी “मराठी आपली आई आहे, तर दुसऱ्या भाषा मावशी आहेत” असे उदाहरण दिले. मातृभाषेबरोबरच राजभाषा आणि देशातील इतर राज्यांच्या भाषांचाही सन्मान करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले.
एकनाथ शिंदेंचीही बहुभाषिकतेवर भूमिका
शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हिंदीच्या विस्ताराबाबत भूमिका मांडली. हिंदीचा विस्तार हा कोणत्याही प्रादेशिक भाषेचे स्थान हिरावून घेण्यासाठी नसून सर्व भारतीय भाषांना सोबत घेऊन पुढे जाण्यासाठी असावा, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राने नेहमीच विविध भाषा आणि संस्कृतींचा सन्मान केला आहे, असे शिंदे यांनी नमूद केले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा महाराष्ट्राला अभिमान आहे आणि त्याचवेळी हिंदीलाही महाराष्ट्राने कायम मान-सन्मान दिला आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मग राज ठाकरेंचा रोख नेमका कोणाकडे?
याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची पोस्ट अधिक चर्चेत आली आहे. अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी एकाच कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राची बहुभाषिक ओळख आणि विविध भाषांचा सन्मान यावर भाष्य केले. त्यानंतर राज ठाकरे यांनी कोणाचेही नाव न घेता “कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते” अशी पोस्ट केली. त्यामुळे राज ठाकरेंनी या भाषाविषयक भूमिकांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, ही पोस्ट अमित शहांच्या वक्तव्यावरच आहे, असे राज ठाकरे यांनी स्वतः स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे सध्या हा केवळ राजकीय अंदाज आहे. राज ठाकरे पुढील काही दिवसांत या पोस्टचा संदर्भ स्पष्ट करतात का, याकडे लक्ष लागले आहे.
भाषेच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय वातावरण?
महाराष्ट्रात मराठी भाषा, हिंदीचा वापर आणि राज्याची भाषिक ओळख हे मुद्दे यापूर्वीही राजकीयदृष्ट्या संवेदनशील राहिले आहेत. विशेषतः मनसेने मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राज ठाकरे यांच्या प्रत्येक भाषाविषयक वक्तव्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असते. एकीकडे सत्ताधारी नेते महाराष्ट्रातील बहुभाषिक संस्कृतीचा उल्लेख करत सर्व भाषांचा सन्मान करण्याची भूमिका मांडत आहेत. दुसरीकडे राज ठाकरे यांची सूचक पोस्ट समोर आली आहे.
‘तूर्तास एवढेच’ म्हणत राज ठाकरेंनी वाढवली उत्सुकता
राज ठाकरे यांच्या पोस्टमधील सर्वाधिक लक्षवेधी भाग म्हणजे “तूर्तास एवढेच…” हा शेवटचा उल्लेख. यामुळे त्यांनी सध्या केवळ संकेत दिला असून पुढे या मुद्द्यावर सविस्तर भाष्य करण्याची शक्यता आहे का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांची शैली पाहता एखाद्या राजकीय मुद्द्यावर आधी सूचक विधान करून त्यानंतर सविस्तर भूमिका मांडण्याचे प्रकार यापूर्वीही पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे या पोस्टनंतर त्यांच्या पुढील वक्तव्याकडे मनसे कार्यकर्ते आणि राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. एका वाक्यातील पोस्ट, कोणाचेही नाव नाही आणि शेवटी ‘तूर्तास एवढेच’… त्यामुळे राज ठाकरेंनी नेमका कोणाला इशारा दिला, याचे उत्तर आता त्यांच्या पुढील भूमिकेतूनच मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…
जरांगेंच्या उपोषणाचा 18वा दिवस, आज मुंबईकडे कूच: आझाद मैदानाच्या परवानगीचा तिढा कायम, तिसऱ्यांदा अर्ज; आंदोलक म्हणाले- आम्ही गणपती पाहायला जाणार

मराठा आरक्षणासाठी निर्णायक आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १८ वा दिवस आहे. आझाद मैदान पोलिसांनी आंदोलनासाठी दोन वेळा परवानगी नाकारूनही जरांगे पाटील आणि मराठा समाज आपल्या ‘मुंबई चलो’च्या भूमिकेवर ठाम आहे. आता मनोज जरांगे आणि काही वकिलांनी मिळून तिसऱ्यांदा पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज दाखल केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी