![]()
ओम नमस्ते गणपतये… मोरया, मोरया… आणि ओम गं गणपतये नमः … च्या जयघोषाने ऋषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उत्साहपूर्ण वातावरणात हजारो महिलांची मोठी गर्दी झाली. तब्बल ३५ हजार पेक्षा जास्त महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. गणेश नामाचा जयघोष, अथर्वशीर्ष आणि महाआरतीने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ट्रस्टच्या १३४ व्या गणेशोत्सवात उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण सोहळा मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. ऋषीपंचमीनिमित्त ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण गणेशोत्सवातील प्रेम मंदिराच्या प्रतिकृतीसमोर झाले. यावेळी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव, सुवर्णयुग तरुण मंडळाचे सौरभ रायकर, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके, सचिन आखाडे, अंकुश रासने यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांचा यावेळी सन्मान करण्यात आले. पावसाचे वातावरण असूनही पारंपरिक वेशात मध्यरात्री २ वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमासाठी हजेरी लावली. हा उपक्रमाचे ४१ वे वर्ष होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर मन शांत करणारा ओंकार जप आणि ‘गणराजा गणनायका…मोरया रे बाप्पा मोरया रे…’ या गणेशगीताच्या सादरीकरणाने वातावरण भक्तीमय झाले. महिलांनी मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. ‘मोरया मोरया दगडूशेठ मोरया…’ असा गणेश नामाचा गजर करताना प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावरील उत्साह दिसून येत होता. दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाड्यापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणासाठी गर्दी केली होती. भक्तीमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली. महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या की, महिला उत्सवाची तयारी करतात, तेव्हाच तो उत्सव पूर्ण होतो. यामुळे संपूर्ण पुणे शहराला शक्ती आणि ऊर्जा मिळाली आहे. महिलांनी हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत गणरायाला नमन केले. मुंबई, सातारा, कोल्हापूर, लातूर या शहरांमधून महिला या उपक्रमासाठी आल्या होत्या. अर्चना भालेराव आणि प्रा. डॉ. गौरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
Source link
35 हजार महिलांनी दगडूशेठ गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठण केले:ऋषीपंचमीनिमित्त पहाटे पारंपरिक वेशात स्त्री शक्तीचा जागर