Headlines

वादळाचा तडाखा:जवळा परिसरात फळबागा भुईसपाट, सरसकट पंचनामे‎करण्याची मागणी‎




जवळा आणि परिसर परिसरामध्ये शुक्रवारी (२२ मे) दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पाऊस आणि तीव्र वादळी वाऱ्याने हाहाकार उडवला. या नैसर्गिक आपत्तीत परिसरातील केळी, पपई, डाळिंब आणि आंब्याच्या शेकडो हेक्टरवरील बागा जमीनदोस्त झाल्या असून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटामुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने सरसकट पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी तीव्र मागणी आता जनतेतून होत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण होते. मात्र, पाऊस किरकोळ स्वरूपाचा असेल असा अंदाज वर्तवला जात असतानाच, शुक्रवारी दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. जवळा परिसर हा कुकडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येत असल्याने हा भाग बागायतदार आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध मानला जातो. येथील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने केळी, डाळिंब आणि पपईच्या बागा फुलवल्या होत्या. मात्र, या वादळाने होत्याचे नव्हते केले. अनेक ठिकाणी सोलर पंपांचे महागडे साहित्य हवेत उडून गेल्याने शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे. यंदा आंब्याचे उत्पादन चांगले होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, वादळामुळे आंबे परिपक्व होण्यापूर्वीच गळून पडल्याने ठिकठिकाणी कैऱ्यांचे ढीग पाहावयास मिळत आहेत. परिपक्व न झालेल्या कैऱ्या मातीमोल झाल्याने शेतकरी तर आर्थिक संकटात सापडलाच आहे, पण सर्वसामान्य जनताही यंदा स्थानिक आंबराईच्या गोडीला मुकणार असल्याचे चित्र आहे. वादळाचा फटका केवळ शेतीलाच नाही तर रहिवासी भागालाही बसला आहे. जवळा येथील एस. टी. बस स्थानक परिसरातील अनेक घरांचे आणि शेडचे पत्रे हवेत उडून गेले. तसेच परिसरात सुरू असलेल्या काही बांधकामांचेही मोठे नुकसान झाले. पारनेर तालुक्यातील जवळा परिसरात केळी बागेचे झालेले नुकसान.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *