![]()
विठ्ठलाच्या दर्शनाची मनात ओढ घेतलेले वारकरी शुक्रवारी २४ रोजी विशेष ट्रेनने नवी अमरावती अकोली रेल्वे स्टेशनवरून वारीला निघाले. त्यावेळी त्यांनी जय हरी विठ्ठल असा एकच गजर केला. २५ रोजी आषाढी एकादशीला ही विशेष ट्रेन स. ९ वाजताच्या सुमारास पंढरपूर स्टेशनवर पोहोचणार आहे. त्यानंतर सर्व वारकरी थेट इंद्रायणी नदीवर जाऊन स्नान करतील. स्नान आटोपल्यानंतर कळसाचे दर्शन घेत मुख दर्शनाच्या रांगेत लागतील. कारण, मुख्य दर्शन रांग लांबच लांब असल्यामुळे आम्हाला रांगेत उभे राहिल्यानंतर सहज दर्शनाचा लाभ होणार नाही, याची जाण असल्याचे वारकरी साधना घोंगडे यांनी सांगितले. आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या पंढरपूरची मातीही कपाळाला लावली तरी पुरेसे आहे. त्यात इंद्रायणीच्या पाण्याने स्नान करून मन व शरीर पवित्र करता येईल. मुख्य दर्शन रांगेत लागता आले नाही तर मुखदर्शन करता येईल, किंवा मंदिराच्या कळसाचे दर्शन तरी करू अशी भावना वारकरी माजी नगरसेविका सुनंदा खरड, लता गंगात्रे, वैशाली आसलकर, मोना ठाकूर, टाले, चौधरी, वंश साहू व इतर भाविकांनी व्यक्त केली. रात्री ७.३० च्या ट्रेनने वारी आटोपून वारकरी परतणार अमरावतीहून पंढरपूरकडे विशेष ट्रेनने निघालेले वारकरी शनिवार २५ रोजी रात्री ७.३० वाजताच्या ट्रेनने परतीच्या प्रवासाला सुरुवात करतील. ही ट्रेन नवी अकोली रेल्वे स्टेशनवर रविवार २६ रोजी दुपारी १२.५० वाजता पोहोचेल. दिवसभर पंढरपूरात पायदळ फिरून, दर्शन रांगेत लागून थकणार असलेल्या वारकऱ्यांनी परतीच्या प्रवासाचेही आरक्षण केले आहे. तरीही या विशेष ट्रेनमध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळते. त्यामुळे एकमेकांना सहकार्य करीत हे वारकरी प्रवास करणार आहेत.
Source link
विठुरायाच्या दर्शनाची ओढ:विशेष ट्रेनने अमरावतीचे वारकरी निघाले पंढरपूरसाठी दर्शनाला