![]()
“देशाचा विकास करायचा असेल तर सर्वात आधी तरुणांचे चारित्र्य आणि व्यक्ती निर्माण होणे गरजेचे आहे. ‘व्यक्ती निर्माण ते राष्ट्र निर्माण’ हाच भारताला जागतिक महासत्ता बनवण्याचा एकमेव मार्ग आहे. जेव्हा या देशातील युवा पिढी सक्षम, सुशिक्षित आणि राष्ट्रप्रेमाने प्रेरित होईल, तेव्हाच समर्थ युवा, समर्थ भारत हे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केले. दर्यापूर तालुक्यातील येवदा येथे ‘स्वयंम मल्टीपर्पज फाउंडेशन’च्या वतीने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या ऐतिहासिक आणि अत्यंत दीमाखदार सोहळ्याचे मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य हेमंत काळमेघ, बाळासाहेब वानखडे, बाळासाहेब हिंगणीकर, मनिष कोरपे, मदन पाटील बायस्कार, सलीम घानिवाले, रामदास कराळे गुरुजी, ओमप्रकाश शर्मा, बाळासाहेब वडतकर, भरत गावंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आपल्या ओघवत्या आणि प्रेरणादायी भाषणात खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी राष्ट्रनिर्माणात तरुणांच्या भूमिकेवर विशेष प्रकाश टाकला. विविध महापुरुषांची उदाहरणे देत त्यांनी उपस्थित तरुणाईमध्ये नवा जोश भरला. ते म्हणाले की, “स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्तीशिवाय थांबू नका’ हा मंत्र आजच्या डिजिटल युगातही तितकाच लागू पडतो. तरुणांनी केवळ स्वतःच्या प्रगतीचा विचार न करता राष्ट्रहिताला प्राधान्य दिले पाहिजे. क्षमतेचा वापर देशासाठी करणे हीच खरी देशभक्ती आहे. पुढे बोलताना त्यांनी मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या ‘विंग्स ऑफ फायर’ (अग्निपंख) चा दाखला दिला. डॉ. कलाम यांनी नेहमीच तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याची शिकवण दिली. कलामांचे जीवन हे व्यक्ती निर्माणातून राष्ट्र निर्माण कसे होते, याचे जिवंत उदाहरण आहे, असे डॉ. बोंडे यांनी नमूद केले. त्यांच्या या मांडणीने आणि राष्ट्रकेंद्री विचारसरणीने कार्यक्रमाला उपस्थित शेकडो तरुण आणि विद्यार्थी कमालीचे आकर्षित झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता स्वयंम मल्टीपर्पज फाउंडेशन’चे शुभम बायस्कर व नकुल सोनटक्के यांच्यासह श्याम ठाकरे, नितीन बढे, चंदू रघुवंशी, मयूर वांदे, रामेश्वर इंगळे, डॉ. संजय पाटील, श्रीधर हिवसे, दीपक कंटाळे, पुरण मोहोड, रघुनाथ खलोकार, अनिल गावंडे, प्रशांत गोडचर, प्रकाश बावनकुळे, दिलीप दवंडे, दिनेश मुंडाले, चंद्रशेखर पवार, सोनटक्के यांनी परिश्रम घेतले. अकॅडमीतून घडताहेत अधिकारी : काळमेघ शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी तळागाळातील सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे मोलाचे कार्य केले. त्यांच्या याच दूरदृष्टीमुळे आज आपला समाज प्रगतशील आणि सुशिक्षित म्हणून ओळखला जातो, असे सांगतानाच श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारी सदस्य हेमंत काळमेघ म्हणाले, शिक्षणापासून एकही गरजू वंचित राहू नये, यासाठी गोरगरीब नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना आवश्यक ती सर्व मदत श्री शिवाजी शिक्षण संस्था करित आहे. त्यांच्यामते डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी आज विविध उच्च पदांवर अधिकारी म्हणून विराजमान होत आहेत.
Source link
व्यक्ती निर्माण ते राष्ट्र निर्माण हाच महासत्तेचा मार्ग- खासदार डॉ.बोंडे:‘मल्टीपर्पज फाउंडेशन’तर्फे 10 वी आणि 12 वीच्या गुणवंतांचा गौरव