![]()
कन्नड अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे माणसाच्या आयुष्याची दिशा भरकटते आणि परिणामी संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून पूर्णपणे दूर राहिले पाहिजे, असे प्रतिपादन कन्नड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश दिंडे यांनी केले. अंधानेर येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये नशामुक्त अभियानांतर्गत अंमली पदार्थांच्या वाढत्या गैरवापरास प्रतिबंध घालणे आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजीव जाधव यांनी केले. कार्यशाळेदरम्यान मार्गदर्शन करताना सहायक पोलिस निरिक्षक सतीश दिंडे यांनी अंमली पदार्थांचे शरीरावर आणि भविष्यावर होणारे घातक दुष्परिणाम सविस्तर स्पष्ट केले. व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व सांगतानाच त्यांनी यासंदर्भातील कायदेशीर तरतुदींची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या जनजागृती कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण प्रशालेतील सहावीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेले ‘नशामुक्ती’ या विषयावरील प्रभावी पथनाट्य ठरले. व्यसनामुळे होणारी कौटुंबिक व सामाजिक हानी त्यांनी आपल्या साभिनय सादरीकरणातून हुबेहूब मांडली, ज्यास उपस्थितांचा मोठा प्रतिसाद लाभला. या पथनाट्याचे दिग्दर्शन करणाऱ्या शिक्षिका आरती बागुल आणि सहभागी विद्यार्थिनींच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सपोनि सतीश दिंडे यांनी त्यांना स्वतःहून अकराशे रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरवले. यावेळी पोलिस शिपाई लोंढे, पोलिस शिपाई ढोंडकर, शिक्षक दिपक सोनवणे, शिक्षिका मीनाक्षी बडग, उषा महाजन यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार संजय केवट यांनी मानले. अंधानेर जि. प. शाळेत व्यसनाधीनतेवर बोलताना सपो नि सतीश दिंडे.
Source link
व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होते- सहायक पोलिस निरीक्षक दिंडे:अंधानेर जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये नशामुक्त अभियान कार्यशाळा