Headlines

शरद पवारांकडून १० प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर:जितेंद्र आव्हाडांसह तरुण चेहऱ्यांना संधी, रोहित पवार बैठकीला गैरहजर




राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) संघटनात्मक पातळीवर महत्त्वाच्या हालचाली सुरू असून पक्षाकडून नव्या 10 प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या या यादीत अनुभवी नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह पक्षातील अभ्यासू आणि तरुण चेहऱ्यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाची भूमिका, धोरणे आणि विविध राजकीय मुद्द्यांवर माध्यमांसमोर अधिकृतपणे भूमिका मांडण्याची जबाबदारी आता या प्रवक्त्यांवर असणार आहे. पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्यासह आगामी काळातील राजकीय रणनीती, विविध संघटनात्मक विषय आणि पक्षाच्या भूमिकेबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कोणाकोणावर सोपवली प्रवक्तेपदाची जबाबदारी? पक्षाने जाहीर केलेल्या नव्या यादीत अनुभवी नेत्यांसोबतच तरुण आणि विविध सामाजिक घटकांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड, क्लाईड क्रास्टो, भीमराव हत्तीअंबीरे, अनिश गवांदे, अॅड. फैजल मिर्झा, महेबूब इब्राहीम शेख, प्रवीण कुंटे पाटील, प्रशांत सोनबा वीरकर, अॅड. हेमाताई पिंपळे आणि डॉ. चंद्रकांत बारेला यांचा समावेश आहे. यापैकी जितेंद्र आव्हाड हे पक्षातील आक्रमक आणि अभ्यासू भूमिका मांडणाऱ्या नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यामुळे त्यांच्याकडे पुन्हा प्रवक्तेपदाची जबाबदारी देणे हे पक्षाच्या माध्यमांमधील आक्रमक भूमिकेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. त्याचबरोबर अनिश गवांदे, महेबूब शेख आणि हेमाताई पिंपळे यांसारख्या तुलनेने नव्या चेहऱ्यांना संधी देत पक्षाने प्रवक्त्यांच्या टीममध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वीच्या सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या रद्द विशेष म्हणजे, नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यापूर्वी पक्षाने यापूर्वी करण्यात आलेल्या सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या होत्या. समोर आलेल्या माहितीनुसार, 4 ऑगस्ट 2026 रोजी पक्षाकडून याबाबत अधिकृत पत्र जारी करण्यात आले होते. शरद पवार यांच्या पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर हे पत्र पोस्ट करण्यात आले होते. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या या पत्रात, यापूर्वी पक्षाच्या प्रवक्तापदासाठी करण्यात आलेल्या सर्व नियुक्त्या पुढील आदेशापर्यंत तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. या कालावधीत माजी आमदार विद्या चव्हाण आणि महेश तपासे हे पक्षाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून प्रसारमाध्यमांसमोर पक्षाची अधिकृत भूमिका मांडतील, असेही त्या पत्रात नमूद करण्यात आले होते. त्यानंतर आता पक्षाने नव्याने 10 प्रवक्त्यांची यादी जाहीर केल्याने पक्षाच्या माध्यम व्यवस्थेत मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे. कोअर कमिटीच्या बैठकीला कोण कोण उपस्थित? शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत पक्ष संघटना आणि विविध राजकीय विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री राजेश टोपे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, माजी खासदार फौजिया खान, राजेंद्र शिंगणे आणि माजी आमदार अॅड. अशोकबापू पवार यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र, या बैठकीला आमदार रोहित पवार उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. रोहित पवारांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार यांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध चर्चा सुरू आहेत. विशेषतः त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या शक्यतेबाबत राजकीय वर्तुळात सातत्याने तर्क-वितर्क लढवले जात आहेत. काँग्रेसमधील काही नेत्यांनाही रोहित पवार यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबाबत प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यावेळी रोहित पवार काँग्रेसमध्ये आल्यास पक्षाची ताकद वाढू शकते, अशा प्रतिक्रिया काही काँग्रेस नेत्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, मागील काही बैठकीलाही रोहित पवार यांनी पक्षाची संमती घेऊन गैरहजर राहणे पसंत केले होते. त्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबतच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे.
हेही वाचा.. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक निर्णय:उईकेंचे उपोषण मागे घेण्याचे आवाहन, विविध प्रश्नांवर तीन महिन्यांत कार्यवाहीचे आश्वासन

आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री आणि विद्यार्थ्यांमध्ये विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांनी मांडलेले प्रश्न आणि मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी माध्यमांशी बोलताना दिली.सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *