Headlines

शाळा 15 ऐवजी 30 जूनपासून सुरू:विदर्भातील उष्णतामान, न्यायालयीन निर्देशामुळे शिक्षण विभागाचा निर्णय




अमरावती जिल्ह्यातील सीबीएसई आणि राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आता १५ जूनऐवजी ३० जूनपासून सुरू होतील. विदर्भातील सध्याचे उष्णतामान, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निर्देश लक्षात घेऊन शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी आणि शाळा व्यवस्थापनांना याबाबतचे निर्देश जारी केले आहेत. शासनाच्या परिपत्रकानुसार, राज्यातील सर्व शाळा १५ जूनपासून सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातील वाढते उष्णतामान आणि उन्हाळी सुट्ट्यांचा कालावधी यामुळे या भागातील शाळा उशिरा सुरू करण्याची मागणी पुढे आली होती. या मागणीच्या अनुषंगाने काही शिक्षक संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर ९ जून रोजी अंतिम सुनावणी झाली. न्यायालयाने विदर्भातील शाळा ३० जूनपासून सुरू करण्याचे आदेश दिले. या न्यायालयीन आदेशाच्या अनुषंगाने जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आणि शैक्षणिक व्यवस्थेतील सुसूत्रता यांना प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना याबाबत तातडीने कळवून आवश्यक कार्यवाही सुनिश्चित करावी आणि आदेशाच्या अंमलबजावणीबाबतचा अहवाल जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत. शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, जिल्ह्यातील कोणत्याही सीबीएसई किंवा राज्य मंडळाच्या शाळेने ३० जूनपूर्वी विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यास सांगू नये. तसेच, शैक्षणिक, प्रशासकीय किंवा इतर कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यात येऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या सूचनेचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *