![]()
शिवसेना नेत्या आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराला भेट देऊन विधिवत पूजा केली. यावेळी त्यांनी जेजुरी देवस्थानच्या प्रगती आणि विकासासाठी अनेक सूचना केल्या, ज्यात सेंद्रिय हळदीचा वापर, आधुनिक भक्तनिवास आणि वाराणसीच्या धर्तीवर कॉरिडॉर उभारणीचा समावेश आहे. त्यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून जनहिताची कामे अधिक वेगाने पूर्ण व्हावीत, अशी प्रार्थनाही केली. याप्रसंगी देवस्थानचे विश्वस्त ऍड. विश्वास पानसे यांनी डॉ. गोऱ्हे यांचा सत्कार केला. पत्रकारांशी बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी जेजुरीतील मुरळी प्रथा बंद करण्यात मिळालेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. धर्म आणि परंपरांचा आदर राखूनही सामाजिक सुधारणा घडवता येतात, यावर त्यांनी भर दिला. यासाठी सर्व समाजघटकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी भंडाऱ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हळदीच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त केली. रासायनिक आणि बनावट हळदीमुळे भाविकांच्या त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, मंदिराच्या ऐतिहासिक दगडी वास्तूलाही धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. देवस्थानने सेंद्रिय हळदीचा वापर वाढवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि भाविकांना मोफत सेंद्रिय हळद उपलब्ध करून देण्याचा विचार करावा, अशी सूचना त्यांनी केली. यासाठी राज्य सरकारच्या सेंद्रिय हळद संशोधन केंद्राची मदत घेता येईल, असेही त्या म्हणाल्या. डॉ. गोऱ्हे यांनी श्री मार्तंड देवसंस्थानला वैयक्तिकरित्या २१ हजार रुपयांची देणगी धनादेशाद्वारे दिली. देवस्थानच्या जमिनीचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, यामुळे जेजुरीच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला. लाखो भाविकांसाठी आधुनिक सुविधा असलेले भक्तनिवास उभारण्याची गरज असून, यासाठी स्थानिक नागरिक आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) संयुक्तपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. वाराणसीच्या धर्तीवर जेजुरीमध्येही धार्मिक पर्यटनाला चालना देणारा कॉरिडॉर विकसित करण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखवली. मात्र, अशा विकासकामांमध्ये स्थानिक नागरिकांचा सहभाग आणि विश्वास महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Source link
डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून जेजुरी विकासासाठी सूचना:सेंद्रिय हळद, भक्तनिवास, कॉरिडॉरची गरज; देवस्थानला पुढाकार घेण्याचे आवाहन