![]()
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सद्या संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू आहे. असे असतानाच तिवसा येथील साबांविच्या विश्रामगृहात एका राजकिय पक्षाच्या सुमारे दहा ते पंधरा जणांनी पार्टी केल्याचा आरोप आहे. उच्च पदस्थांसाठी आरक्षित असलेल्या व्हीआयपी सूटवर ताबा मिळवला आणि तिथे पार्टी आयोजित केल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. याप्रकरणात आचारसंहितेचा भंग आणि निष्काळजीपणा करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन मंगळवारी (दि. २६) जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. संबंधित राजकीय व्यक्तींनी विश्रामगृहातील व्हीआयपी सूट ताब्यात घेतला. त्यावेळी मंत्रालयातील काही कर्मचारी, अधिकारी ऑडिटसाठी आले होते, त्यांना बाहेर काढण्यात आले. शिवाय, रेस्टहाउस कर्मचाऱ्यांना दमदाटीसुद्धा करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. यावेळी निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक यांनाही पाठवण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी अनिल थुल, वैभव वानखडे आणि प्रशांत कांबळे यांचा समावेश होता. निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या या संपूर्ण घटनेची जिल्हास्तरीय स्वतंत्र चौकशी समितीमार्फत निष्पक्ष चौकशी व्हावी, विश्रामगृहातील सीसीटीव्ही फुटेज, व्हिजिटर रजिस्टर, व्हीआयपी सूट आरक्षण नोंदवहीची तपासणी करावी तसेच उपस्थित कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात यावेत. संबंधित राजकीय पदाधिकाऱ्यांवर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल व्हावेत. विश्रामगृहाचे नियंत्रण व देखरेख करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबधित जबाबदार अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे.
Source link
शासकीय विश्रामगृहातील पार्टीप्रकरणी केली तक्रार:प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी