![]()
शिक्षणाचा उद्देश केवळ चांगली नोकरी मिळवणे, मोठे पॅकेज मिळवणे आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न होणे एवढाच मर्यादित नसावा. शिक्षणातून मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी आणि गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठीही झाला पाहिजे. स्वतःच्या पायावर उभे राहताना इतरांसाठी काहीतरी करण्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केले. ‘फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाइव्हज’ (फ्युएल) या संस्थेचा २० वा स्थापना दिन आणि द्वितीय दीक्षांत समारंभाच्या ते बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते व्यवस्थापन तुकडी २०२४-२६ मधील विद्यार्थ्यांसह विविध सीएसआर-सहाय्यित प्रमाणपत्र अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या. याच व्यासपीठावरून ‘फ्युएल स्किलटेक युनिव्हर्सिटी, पुणे’ या नूतन विद्यापीठाच्या उद्घाटनाची औपचारिक घोषणा केली. यावेळी स्किलटेक अँड आंत्रप्रेन्युअरशिप विद्यापीठ (फ्युएल) कुलपती डॉ. सुलभा देशपांडे, फ्युएलचे अध्यक्ष आणि कुलगुरू केतन देशपांडे, बजाज फिनसर्व्ह ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक गणेश मोहन, तसेच एसबीआय फाउंडेशनचे अध्यक्ष आणि मुख्य परिचालन अधिकारी (सीओओ) प्रत्युष मेहरोत्रा, आमदार राणा जगजितसिंह पाटील प्रा. मयुरी देशपांडे, ऑलकार्गो ग्रुपचे अध्यक्ष, शशी किरण शेट्टी उपस्थित होते. राजेंद्र आर्लेकर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या हातात पदव्या, डिप्लोमा आणि विविध प्रमाणपत्रे आहेत. मात्र, या पात्रतेचा उपयोग प्रत्यक्ष कामात कसा केला जाणार, समाजासमोरील प्रश्न सोडविण्यासाठी विद्यार्थी काय योगदान देणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. केवळ भाषणे ऐकण्यापेक्षा त्यातील विचार कृतीत उतरविणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. त्याच बरोबर शैक्षणिक जीवनातील अनुभव सांगताना आर्लेकर म्हणाले, गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनी चांगले गुण, आर्थिक सुबत्ता, बंगला आणि महागड्या गाड्या मिळविणे म्हणजेच शिक्षणाचे यश आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिक्षणातून चांगला माणूस घडविण्यालाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. फ्युएल मॉडेल हा शिक्षणाचा एक अनोखा दृष्टिकोन आहे, जो शैक्षणिक अध्ययन, व्यावहारिक कौशल्य विकास, उद्योग क्षेत्राशी सहयोग आणि उद्योजकता यांचा मेळ घालतो. तरुणांना व्यावसायिक जगासाठी सज्ज करण्याच्या दिशेने फ्युएल जे कार्य करत आहे, ते एक उत्तम उदाहरण आहे. शैक्षणिक संस्थांनी आणि देशातील प्रत्येक राज्याने याचा विचार करून, आपल्या स्थानिक गरजांनुसार ते स्वीकारायला हवे. असे आर्लेकर यांनी सांगितले.
Source link
शिक्षणाचा उद्देश पैसा कमावणे नाही, माणूस घडवणे असावा:राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे फ्युएलच्या दीक्षांत समारंभात प्रतिपादन, नव्या विद्यापीठाची घोषणा