![]()
शिक्षणाकडे केवळ उद्योग, व्यवसाय, नोकरी किंवा रोजगाराचे साधन या मर्यादित दृष्टिकोनातून पाहणे चुकीचे आहे. शिक्षणामुळे मन आणि मेंदू चिकित्सक बनतात. समाजाला नैतिक आणि विवेकवादी माणूस घडवण्याचे खरे काम शिक्षणच करते, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केले. कन्नड येथील शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित पदवी प्रदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. डॉ. गव्हाणे म्हणाले, आज सोशल मीडियाच्या युगात व्हॉट्सॲप आणि फेसबुकवरून सर्व ज्ञान मिळते अशी धारणा पसरत आहे. मात्र, शिक्षक केवळ माहिती पुरवत नाहीत, तर विद्यार्थ्यांमध्ये शहाणपण पेरून बुद्धिप्रामाण्यवादी नागरिक घडवतात. आजच्या काळात माहितीचा साठा प्रचंड वाढत असला तरी नैतिकतेचा ऱ्हास होत आहे, हे मानवी समाजापुढील मोठे संकट आहे. त्यामुळे केवळ पोट भरण्यासाठी नव्हे, तर एक चांगला माणूस बनण्यासाठी शिक्षण घ्या. कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. विजय भोसले, प्रा. विश्वंभर देशपांडे, प्रा. एम. एस. शेख, डॉ. उदय डोंगरे, प्रा. प्रकाश महाजन, प्रा. मीना वडगुळे, राहुल क्षीरसागर आणि उपप्राचार्य बी. के. मगरे उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. विजय भोसले यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय डॉ. सुनील गोरडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. के. एल. भानुसे यांनी केले आणि शेवटी प्रा. प्रतिभा अहिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्याला प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाची आणीबाणी समजून घ्यावी : डॉ. प्रतिभा अहिरे सामाजिकशास्त्र विभागाच्या अधिष्ठाता डॉ. प्रतिभा अहिरे म्हणाल्या, आज गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहेत. देशातील या शिक्षणाची आणीबाणी विद्यार्थ्यांनी समजून घेतली पाहिजे. समाजात नैतिक मूल्ये टिकली नाहीत, तर येणारा काळ अधिक गंभीर असेल. तसेच शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव चंद्रकांत देशमुख म्हणाले, केवळ पदवीची कागदपत्रे हातात असून चालणार नाही, तर खरी गुणवत्ता आणि ज्ञानच तुम्हाला जगात टिकवून ठेवेल.
Source link
शिक्षणामुळेच बुद्धिप्रामाण्यवादी माणूस घडतो- डॉ. गव्हाणे:कन्नड येथील शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पदवी प्रदान समारंभ उत्साहात