![]()
अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीगोंदे तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने उपचाराअभावी दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना गुरुवारी घडली. आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे संतप्त गावकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र
.
गुरुवारी सकाळी ९ वाजता आनंदी अनिल कांडेकर (४) व वीरा प्रवीण कांडेकर (३) या दोन मुली खेळताना शेततळ्यात पडल्या. गावकऱ्यांनी त्यांना तात्काळ बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्राकडे रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत मुळे यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे उपचारासाठी दौंडला नेण्यास विलंब झाल्याने मुलींचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर ग्रामस्थांचा संयम सुटला आणि त्यांनी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैला डांगे यांना ४ तास आरोग्य केंद्रातच डांबून ठेवले. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळी पोहोचून कुलूप कोणी लावले, अशी विचारणा करताच सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस आणि आंदोलक अधिक आक्रमक झाले.
प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करणार
लोणी व्यंकनाथ येथे रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे घडलेल्या घटनेचा आणि आंदोलनाचा संपूर्ण अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल. या प्रकरणात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कडक कारवाई होईल. – डॉ. ज्योती मांडगे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी.
ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे विदारक वास्तव उघड
शेततळ्यात बुडाल्यासारख्या घटनांत रुग्णाला सुरुवातीच्या काही मिनिटांत उपचार मिळणे अत्यंत गरजेचे असते. ताज्या घटनेने ग्रामीण भागात आपत्कालीन सुविधांच्या अभावावर व सुस्त प्रशासनावर प्रकाश टाकला आहे. रुग्णवाहिका उपलब्ध नसणे, हे व्यवस्थेचे मोठे अपयश आहे.